भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या चांगलेच चर्चेत असून, त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सामनातून देखील सोमय्यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी जोरदार टीका केली असून, ‘हिंमत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असे आव्हान किरीट सोमय्या यांनी केले आहे. जर किरीट सोमय्याची हास्यजत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, तर मग ‘सामना’मधून किरीट सोमय्याची दखल का घेता?, असा थेट सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले सोमय्या?
किरीट सोमय्यांची कोल्हापूर दौऱ्यात अडवणूक करणे गैर आहे, असे खुद्द शरद पवार स्वत: बोलतात. सरकारला सांगावे लागते की दौरा अडवला याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला नव्हती, हे अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांचा दौरा सरकारला का अडवावा लागतो. हे सगळे सरकार का करतेय?, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला. उद्यापासून मुंबई प्रभादेवी येथून सोमय्या आपल्या कोल्हापूर दौऱ्याला प्रारंभ करतील. या दौऱ्यात कोल्हापूरमधील मुरगुड, कागल, इथे भेट देण्याचा सोमय्यांचा मानस आहे. कोल्हापूर पोलिस स्टेशनला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसऱ्या घोटाळ्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार आहे. यावेळी सोमय्यांबरोबर भाजप नेत्यांची फौज असणार आहे. कोल्हापूर दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अशिष शेलार आणि गोपाळ शेट्टी सोमय्यांबरोबर असतील.
(हेही वाचा : अजितदादांनी मुख्यमंत्र्यांचे ऐकावे, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीतच आहेत!)
हसन मुश्रीफ यांच्यावर काय आहे आरोप?
हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी १२७ कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला होता. तसेच मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याचे सोमय्या म्हणाले होते. मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडियाचे बेनामी मालक आहेत. या कंपनीत ७,१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे. आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार, असे सोमय्या म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community