मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या वाढत्या समस्यांमुळे मुंबई महापालिकेने आता यावर उपाय म्हणून रस्त्यांचे सिमेंट -काँक्रिटीकरण करण्याचा निर्धार केला. हा निर्णय घेतला जात असतानाच चक्क सिमेंट-काँक्रीटचा रस्ता डांबराचा (अस्फाल्ट) बनवल्याची बाब निदर्शनास आली आहे. सिमेंट-काँक्रीटच्या या रस्त्यावर चक्क अस्फाल्टचा थर चढवला गेला आहे. हा रस्ता दादर मधील असून, प्रशासन नक्की खड्डे चुकवण्यासाठी कोणकोणते प्रयोग करत करदात्यांच्या पैशांचा चुराडा करणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(हेही वाचाः नालेसफाईची कंत्राटे मान्य, पण रस्ते विकास कामांची अमान्य: एकाच अतिरिक्त आयुक्तांकडून असे का घडते?)
म्हणून घेतला सिमेंट-काँक्रिटीकरणाचा निर्णय
मुंबईत पुन्हा एकदा खड्ड्यांच्या समस्येने डोके वर काढले असून, प्रशासनातील अधिकारी आकडेवारी खेळत खड्डे बुजवत असल्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यानंतरही मुंबईतील खड्ड्यांची समस्या कमी झालेली नसून उलट या वाढत्या समस्येमुळे नागरिक बेहाल झाले आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार डांबराचे रस्त्यांत(अस्फाल्ट रोड) असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.
(हेही वाचाः रस्त्यांच्या निविदांवरुन भाजपा-शिवसेना भिडले)
म्हणून खड्ड्यांचे साम्राज्य
मात्र, एका बाजूला ही स्वप्ने प्रशासन दाखवत असले तरी दादर पूर्व येथील रानडे मार्गाच्या इतिहासात वेगळेच गूढ उकरले जात आहे. रानडे मार्गावर बाबाराव सावरकर चौकापासून ते शुश्रूषा हॉस्पिटल सिग्नलपर्यंत सिमेंट- काँक्रीटचा रस्ता बनवला असून, सध्या हा काँक्रीटचा रस्ताच अस्तित्वात नाही. मुळात सिमेंट-काँक्रीटच्या या रस्त्यावर अस्फाल्टचा थर चढवून त्याचे डांबरीकरण केले आहे. याच डांबरीकरणामुळे जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्ससमोरील रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत आहेत. आजवर हे खड्डे अनेकदा बुजवले गेले, तरीही पुन्हा या खड्ड्यांची तोंडे उघडी पडत आहेत.
प्रशासनाची मानसिकता आहे का?
त्यामुळे महापालिकेने बनवलेल्या सिमेंट-काँक्रिटीकरणाची वाटचाल पुन्हा अस्फाल्टच्या दिशेने होत असल्याने नक्की खड्ड्यांची समस्या निकाली काढण्याची प्रशासनाची मानसिकता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला याबाबत कल्पना नसून माहिती घेतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचाः केईएममधील ‘त्या’ कंत्राटी लिपिक पदांच्या भरतीत असा झालाय बदल)
Join Our WhatsApp Community