मुंबईसह ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झालेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलिस अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाला पाठवला आहे. मुंबई ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये सुमारे २५ पोलिस अधिकाऱ्यांची नावे या प्रस्तावात आहेत. यामध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र प्रत्येकाची या गुन्ह्यात भूमिका तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
५ पोलिस ठाण्यांमध्ये खंडणीच्या तक्रारी
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह मुंबईतील दोन पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, तसेच ठाण्यातील एका पोलिस उपायुक्तांसह इतर पोलिस अधिकारी असे एकूण २५ जणांविरुद्ध मुंबईतील मरीन ड्राईव्ह, आंबोली तसेच ठाण्यातील कोपरी, नौपाडा आणि ठाणे नगर अशा एकूण ५ पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या तक्रारदारांनी खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत.
(हेही वाचाः पदांच्या भरतीसाठी सुरू आहे ‘दलाली’! फडणवीसांचा गंभीर आरोप)
एकाही अधिका-याला अद्याप अटक नाही
यापैकी मरीन ड्राईव्ह, कोपरी आणि ठाणे नगर पोलिस ठाण्यांनी खाजगी इसमांना अटक केली आहे. या दोन्ही खाजगी इसमांची तीन गुन्ह्यांत नावे आहेत. मात्र अद्याप या पाचही गुन्ह्यांत एकाही अधिका-याला अटक करण्यात आलेली नाही. यातील काही अधिका-यांची जिल्ह्याच्या बाहेर तर काही अधिका-यांची त्याच जिल्ह्यात साईड पोस्टिंगवर बदली करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे जाणार फाईल
राज्य पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाकडे पाठवलेल्या प्रस्तावात या अधिकाऱ्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे. यावर गृहखात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गुन्हे दाखल झालेल्या अधिका-यांची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट केली जाईल. या माहितीसाठी ही फाईल पोलिस महासंचालक कार्यालयात पाठवण्यात आली आहे. प्रत्येकाची भूमिका समोर आल्यानंतरच गृह विभाग यावर निर्णय घेईल. तसेच यामध्ये पोलिस महासंचालक दर्जा आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांची नावे देखील असल्यामुळे ही फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः परमबीर सिंह यांच्या विरोधात वॉरंट जारी)
एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिका-यांवर कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पोलिस दलाची प्रतिमा जपण्यात येईल. तसेच पोलिस दलाचे मनोबल बिघडू नये याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येणार असल्याचे गृह विभागाच्या अधिका-यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community