गेल्या काही दिवसांपासून प्रताप सरनाईक, अनिल परब आणि भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलेला असतानाच आता शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सोमवारी सकाळी ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यानंतर अडसूळांची तब्येत बिघडली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ईडीचे समन्स
अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ पिता-पुत्रांना ईडीकडून हे समन्स बजावण्यात आल्याचे समजत आहे. 10 सप्टेंबर रोजी ईडीकडून अडसूळ पिता-पुत्र तसेच अडसूळांचे जावई यांच्या घरी व कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या होत्या.
(हेही वाचाः माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळांना ईडीचे समन्स! काय आहेत आरोप?)
शिवसेना नेत्यांनी केला निषेध
ईडीच्या या कारवाईचा शिवसेनेच्या नेत्यांकडून निषेध करण्यात येत आहे. केंद्रातील आपली ताकद लावून शिवसेना नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. आनंदराव अडसूळांना सकाळी साडे आठ वाजता समन्स बजावण्यात आले व आजच्या आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ न देता केवळ खच्चीकरण करण्याचे काम केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे केंद्रीय यंत्रणांना कोणीही गांभीर्याने घेणार नाही, अशी प्रतिक्रियाही कायंदे यांनी व्यक्त केली आहे.
काय आहेत आरोप?
फेब्रुवारी महिन्यात अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 91 हजार खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी अडसूळ यांच्यावर केला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बँकेत जमा झालेला पैसा मोठ्या कंपन्या, बिल्डर यांना कर्ज स्वरुपात दिले होते. एवढेच नाही तर बँकेच्या पैशाचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेण्यासाठी केला, असा आरोप रवी राणा यांनी केला होता.
(हेही वाचाः महाविकास आघाडीची ऑटो आता भाजपा करणार पंक्चर)