सोमवारी मुंबईत महिला लसीकरणाच्या लक्ष्याची ‘लक्षपूर्ती’

115

मुंबईतील सर्व नागरिकांचे जलद लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन वेगाने काम करत आहे. सर्वांना लसीकरणाचा समान लाभ घेता यावा यासाठी महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबवताना अनेक नव्या युक्त्या करण्यात येत आहेत. सोमवार 27 सप्टेंबर रोजी मुंबईतील सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रांवर केवळ महिलांसाठी महापालिकेकडून लसीकरण आयोजित करण्यात आले होते.

याला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला असून तब्बल 1 लाख 26 हजार 419 महिलांचे लसीकरण पार पाडण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या या नियोजनाने सर्वांनाच लसीकरणाचा लाभ मिळण्यास मदत होत असल्याचे दिसत आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

WhatsApp Image 2021 09 27 at 11.57.52 PM

(हेही वाचाः अबब…दहिसर, वालभट/ओशिवरा नदीच्या शुद्धीकरणावर १३०० कोटी रुपये)

आदित्य ठाकरे यांचे ट्वीट

27 सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेकडून सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ महिलांसाठी लसीकरण आयोजित करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेत एकूण 1 लाख 26 हजार 419 महिलांना लसींचा डोस देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा इतक्याच संख्येने महिलांचे लसीकरण झाले होते. लसीकरण मोहिमेत कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

याआधीही मिळाला उत्तम प्रतिसाद

शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी सुद्धा महापालिकेकडून केवळ महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवण्यात आले होते. त्यावेळी एकूण १ लाख २७ हजार ३५१ महिलांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या मोहिमेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून, महापालिकेकडून 27 सप्टेंबर रोजी सुद्धा हे विशेष सत्र राबवण्यात आले होते. या लसीकरण सत्रात पहिल्या व दुस-या डोससाठी महिलांचे थेट(वॉक-इन) लसीकरण करण्यात आले.

WhatsApp Image 2021 09 27 at 11.57.53 PM

(हेही वाचाः सोमवार महिलांचा, मंगळवार शिक्षक व विद्यार्थ्यांचा… मग चला लसीकरणाला)

मंगळवारी शिक्षक व विद्यार्थ्यांचे लसीकरण

मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात येईल. याच दिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत, दुसरा डोस बाकी असणाऱ्या पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही कोविड लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही.

ही कागदपत्रे आणणे आवश्यक

मंगळवारी होणा-या लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांनी, येताना शासकीय ओळखपत्र(आधार कार्ड इ.) आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.