महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीकडून दुस-यांदा समन्स बजावण्यात आल्यानंतर ते 28 सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत. ईडी कार्यालयात जाण्याआधी स्वतः पत्रकारांशी बोलताना परब यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता चौकशीत ते कुठली माहिती देणार याबाबत आता अनेकांना उत्सुकता आहे.
काय म्हणाले परब?
मला ईडीने कशासाठी बोलावले हे मलाच माहीत नाही. तिकडे गेल्यावरच कळेल की मला कशासाठी बोलावले आहे. मी चौकशीला सामोरं जात आहे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देईन आणि ईडीला पूर्णपणे सहकार्य करेन, असे अनिल परब यांनी ईडी कार्यलयात जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
(हेही वाचाः जावेद अख्तर ‘हाजीर हो’: संघाबाबत केलेल्या विधानासाठी न्यायालयाकडून नोटीस)
दुस-यांदा बजावले समन्स
मनी लाँन्ड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीकडून अनिल परब यांना 25 सप्टेंबर रोजी दुस-यांदा समन्स बजावण्यात आले होते. याआधी 28 ऑगस्ट रोजी त्यांना ईडीने पहिल्यांदा समन्स बजावून 31 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी परब यांनी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतली होती. माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही, त्यामुळे दोन आठवड्यांनंतरची वेळ मला देण्यात यावी. तसेच माझ्या चौकशीचे कारण स्पष्ट करावे. तसे केल्यास मला चौकशीत योग्य ती माहिती देता येईल, असे परब यांनी ऑगस्टमध्ये ईडीला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.
Join Our WhatsApp Community