पंजाबच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नवज्योतसिंग सिद्धू यांनी तडकाफडकी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिला. त्यामुळे मंगळवारी पुन्हा एकदा पंजाबमधील राजकारण तापले. सिद्धू यांच्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे काँग्रेसला राजकीय नुकसान होईल, या भीतीपोटी काँग्रेस हायकमांडनेच सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितला असावा अशी चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे २०२२मध्ये होणाऱ्या पंजाबच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवा, यासाठी सिद्धू यांनी ही खेळी खेळली आहे का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेले आरोप!
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सोनिया गांधी यांनी दिलेल्या पत्रामध्ये सिद्धूवर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये सिद्धू यांचे भाजपशी घनिष्ट संबंध आहेत. त्यांचे पाकिस्तानशीही संबंध आहेत. ते जर काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बनतील, तर त्यांना कडाडून विरोध केला जाईल. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला होता. त्यावर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधी यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवला आहे. सध्या पंजाबमध्ये नव्या मुख्यमंत्री पदाची शपथविधी व्हायची आहे. पंजाबची घडी बसवायची बाकी आहे. अशा वेळी सिद्धू यांनी अचानक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच वेळी काँग्रेसचे काम करत राहणार, असेही त्यांनी सांगितले आहे. यावर अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये “मी तुम्हाला सांगितले होते… ती एक स्थिर व्यक्ती नाही आणि पंजाब राज्यासाठी योग्य नाही,” असे म्हटले आहे.
I told you so…he is not a stable man and not fit for the border state of punjab.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 28, 2021
(हेही वाचा : चिपीचे उद्घाटन : मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर, राणे मात्र तिसऱ्या स्थानी!)
तर्कवितर्क सुरु!
नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनले तर देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरतील, असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे. त्यामुळे सिद्धू यांनी हे पाऊल उचलले आहे. यामागे सिद्धू यांना त्यांच्याकडे लक्ष आकर्षित करायचे आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. पंजाबच्या पुढील निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहण्यासाठी सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असावा, अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष पदावर राहून त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राहता येणार नाही, त्यामुळे सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःचे हात मोकळे केले आहेत का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.
काँग्रेस हायकमांडशी चर्चा नाही?
दरम्यान सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी हायकमांडशी चर्चा केली नाही, असे समजते. मात्र मंगळवारीच कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत, अशीही चर्चा सुरु झाली आहे. जर कॅप्टन भाजपात गेले तर पंजाबमध्ये ते मोठ्या ताकदीनिशी काँग्रेसच्या विरोधात मैदानात उतरतील, त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसेल, म्हणून काँग्रेस हायकमांडनेच सिद्धूला माघार घ्यायला लावली का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community