100 कोटींच्या वसुलीचा लेटर बॉम्ब टाकत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आता गायब असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. 4 मे 2021 पासून परमबीर सिंह वैद्यकीय रजेवर आहेत. मात्र आता पाच महिने उलटूनही सिंह यांचा पत्ता लागत नसल्याने याचं नेमकं कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
पोलिसांनी घेतला शोध
अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणा-या चांदीवाल आयोगाने सिंह यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ते चौकशीला हजर न राहिल्याने आयोगाने कठोर भूमिका घेतली. 7 सप्टेंबर रोजी आयोगाने त्यांच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट जाहीर केले. तसेच सिंह यांना हे वॉरंट देण्यासाठी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे आदेश आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले होते. त्यानुसार परमबीर सिंह यांना शोधण्याचा महाराष्ट्र पोलिसांनी प्रयत्न केला. परंतु त्यांचा शोध लागला नाही, त्यामुळे परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(हेही वाचाः परमबीर सिंह यांच्या विरोधात वॉरंट जारी)
काय आहे प्रकरण?
मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करत मोठा लेटर बॉम्ब फोडला. त्यामुळे देशमुखांना आपले गृहमंत्रीपद सोडावे लागले व ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या फे-यात अडकले. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. राज्य सरकारनं देखील चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची समांतर चौकशी करत आहे.
सिंह यांना निलंबित करण्यासाठी प्रस्ताव
मुंबईसह ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यामुळे परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलिस अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाला 25 सप्टेंबर रोजी पाठवला.मुंबईतील मरीन ड्राईव्ह, आंबोली तसेच ठाण्यातील कोपरी, नौपाडा आणि ठाणे नगर अशा एकूण ५ पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या तक्रारदारांनी त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत.
(हेही वाचाः परमबीर सिंह यांच्यासह ‘त्या’ अधिका-यांचे होणार निलंबन? गृह खात्याकडे प्रस्ताव)
Join Our WhatsApp Community