पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण त्याच पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या महाविद्यालयातच मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या या विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या केबनिमधील काचेवर आपले डोके फोडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ख्यातनाम असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात ही घटना घडली आहे.
मारहाणीचा आरोप
महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये शुभम बोराटे या 23 वर्षीय विद्यार्थ्याने आधी प्राचार्यांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर संतापून त्याने केबिनच्या दरवाज्यावर डोकं आपटत स्वत:चं डोकं फोडून घेतलं. या विद्यार्थ्याने महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. महाविद्यालयाच्या 40 ते 50 जणांनी मिळून आपल्याला प्रचंड मारहाण केल्याचा आरोप त्याने केला आहे. याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थ्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
(हेही वाचाः पिंपरी-चिंचवड हादरले… 48 तासांत झाले चार खून)
फी माफीवरुन घडला प्रकार
हा सर्व प्रकार फी माफीच्या मुद्द्यावरुन झाला आहे. संबंधित घटनेबद्दल शुभम बोराटेने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत नेमकं काय-काय घडलं याबाबतची माहिती दिली. महाविद्यालय प्रशासन आणि प्राचार्य यांनी फी माफी न देता उद्धटपणे वागल्याचे तरुणाने म्हटले आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
दुसरीकडे महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी याबाबत महाविद्यालयाची भूमिका मांडली. ‘संबंधित विद्यार्थ्याने मला फी माफ करा, असं सांगितलं. त्यावर मी त्याला अशी सर्व फी माफ करता येणार नाही, असे सांगितलं. विद्यार्थ्याला ही भूमिका सांगितल्यानंतर त्याने काचेवर डोकं आपटून काच फोडली. त्यात शिपाई जखमी झाला असून, त्याला दवाखान्यात दाखल केलं आहे. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली व पोलिस त्या विद्यार्थ्याला घेऊन गेले. संबधित प्रकरणात महाविद्यालयाने पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचाः पिंपरी-चिंचवड मध्ये गेल्या सात दिवसांत इतक्या हत्या)
Join Our WhatsApp Community