एकीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा मागे लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे मुंबईत विविध मुद्द्यांवरुन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी घेरायला सुरुवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांची स्थिती पाहून प्रशासन मुंबईकरांना खड्ड्यात घालायला निघाल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत असतानाच, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही यात उडी घेतली आहे.
रस्त्यांमुळे सामान्य नागरिकांना भोगावा लागणारा त्रास सांगत अमित ठाकरे यांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधला आहे. न्यायालयातही खोटे बोलणा-या या भ्रष्टाचा-यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट करुन टीका केली आहे.
(हेही वाचाः अभियंत्यांना खड्डे पावले : इतर कामांमधून करणार कार्यमुक्त)
काय आहे अमित ठाकरेंचा आरोप?
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन यामुळे सर्वांच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला आहे.
जनतेच्या न्यायालयातच शिक्षा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल, अशी झणझणीत टीका अमित ठाकरे यांनी केली आहे.
(हेही वाचाः पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, आधी मदत करा! राज ठाकरेंचे राज्य सरकारला पत्र)
निवडणुकांसाठी अमित ठाकरेंनी कसली कंबर
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसेने अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी निवडणुकांसाठी अमित ठाकरे यांच्यावर उत्तर-पूर्व भागातील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या समस्या समजून घेऊन सत्ताधारी पक्षाला जेरीस आणण्यासाठी अमित ठाकरे आणि मनसे कामाला लागले आहेत.
Join Our WhatsApp Community