साडी नेसल्याने महिलेला प्रवेश नाकारणा-या रेस्टॅारंटला टाळे… काय आहे कारण? वाचा

120

साडी नेसल्याने एका महिलेला दिल्लीतील अक्कीला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. यावरुन नेटक-यांनी त्या हॉटेल प्रशासनावर चांगलीच टीका केली होती. कायमंच वेस्टर्न क्लोथ्सला कूल म्हणणा-या महिलांनीही याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली होती. त्याच अक्कीला रेस्टॉरंटवर आता मोठी नामुष्की ओढवली असून, या रेस्टॉरंटला टाळं लावण्यात आलं आहे.

का बंद करण्यात आलं रेस्टॅारंट?

या रेस्टॅारंटला टाळं लागण्यामागचं कारण साडी नेसलेल्या स्त्रीला प्रवेश नाकारणं नसून, हे रेस्टॉरंट हेल्थ ट्रेड परवान्याशिवाय चालत असल्याचा आरोप एका नागरी संस्थेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या रेस्टॅारंटच्या मालकाला नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आलं. दक्षिण दिल्ली महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेस्टॉरंट 27 सप्टेंबर रोजी बंद झाले. हे रेस्टॉरंट वैध परवान्याशिवाय चालत होते. प्रशासनाने प्रथम नोटीस बजावली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

(हेही पहाः साडी नेसली म्हणून तिला रेस्टॉरंटमध्ये…)

जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा

24 सप्टेंबर रोजी रेस्टॅारंटला बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी 21 सप्टेंबर रोजी केलेल्या तपासणीत हे रेस्टॅारंट आरोग्य व्यापार परवान्याशिवाय अस्वच्छ स्थितीत कार्यरत असल्याचं आढळलं, म्हणून ते बंद करण्याची नोटीस दिली गेली. एवढेच नाही तर, रेस्टॉरंटने सार्वजनिक जमिनीवरही बेकायदेशीर कब्जा केला आहे.

कारवाईचे आदेश

सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी 24 सप्टेंबर रोजी रेस्टॉरंटच्या जागेची पुन्हा पाहणी केली त्यावेळी रेस्टॉरंट पूर्वीसारखेच चालू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर एसडीएमसीने अक्कीला रेस्टॉरंटला नोटीस जारी केली व नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 48 तासांच्या आत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तसे न झाल्यास कोणतीही नोटीस न देता सील करण्यासह योग्य कारवाई केली जाऊ शकते, असे रेस्टॉरंट प्रशासनाला सांगण्यात आले होते.

(हेही वाचाः लेडीज टेलर ते संशयित दहशतवादी… महाराष्ट्र एटीएसकडून आणखी एकाला अटक)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या आठवड्यात फेसबूक पोस्टमध्ये एका महिलेने दावा केला होता की तिला साडी नेसून गेल्याने अक्कीला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटमधील कर्मचा-याने महिलेला साडी हा त्यांच्या रेस्टॉरंटच्या स्मार्ट कॅज्यु्अल्स मध्ये बसत नसल्याचे सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंट प्रशासनाने एक सीसीटीव्ही फुटेज दाखवत आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या नावावर टेबल आरक्षित नसल्याने कर्मचा-यांनी तिला थांबायला सांगितले. यावरुन महिलेने कर्मचा-यांशी हुज्जत घातल्याचे रेस्टॉरंटने आपल्या निवेदनात म्हटले होते.

एसडीएमसी हाऊसच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अँड्र्यूज गंजमधील कॉंग्रेसचे नगरसेवक अभिषेक दत्त यांनी एक प्रस्ताव आणला. या प्रस्तावात जे भारतीय रेस्टॉरंट, बार किंवा हॉटेलच्या पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारेल त्याच्या विरोधात 5 लाख रुपये दंड आकारला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.