राज्य सरकारच्या सर्व विभागांतील रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊनही काही विभागांनी दिरंगाई केल्याचे समोर आले आहे. या विभागांनी दिरंगाई केल्याने आता रिक्त पदांची माहिती जमा करण्याची डेडलाईन देखील हुकली आहे.
MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते. मात्र राज्य सरकारच्या 43 विभागांपैकी केवळ 10 विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे माहिती जमा केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता इतर विभागांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान एमपीएससीकडे माहिती देणाऱ्या विभागांमध्ये पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, कामगार, वित्त व लेखा, परिवहन, शिक्षण, कौशल्य विकास, वनसेवा, मंत्रालय या विभागांचा समावेश आहे. तर बाकीच्या विभागांची माहिती जमा करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. राज्य शासनाच्या उर्वरित विभागांकडून येत्या दोन ते तीन दिवसात इतर माहिती जमा होईल, अशी शक्यता आहे.
(हेही वाचा : महाविद्यालये कधीपासून होणार सुरु? काय म्हणाले मंत्री उदय सामंत?)
15,511 पदे भरणार
राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली.
Join Our WhatsApp Community