श्री काशीविश्वेश्वर मंदिरातील २३० वर्षांपूर्वीच्या पाषाण मूर्ती गायब

माहिम येथील मोगल लेन या ठिकाणी दादोबा जगन्नाथ रिलीजस ट्रस्ट संचालित पुरातन श्री काशीविश्वेश्वर मंदिर आहे.

161

माहिमचे पुरातन मंदिर श्री काशीविश्वेश्वर मंदिरातील २३० वर्षे प्राचीन पाषाणच्या पाच मूर्ती दोन वर्षांपूर्वी गुढरीत्या गायब झालेल्या होत्या. मूर्ती गायब होण्यामागे विश्वस्त मंडळ असल्याचा संशय स्थानिक नागरिक प्रसाद ठाकूर यांनी व्यक्त करून धर्मादाय आयुक्त आणि माहिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेच्या दोन वर्षे उलटूनही माहिम पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी हा तपास बंद केला असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. मात्र हे प्रकरण बंद करण्यात आलेले नसून संबंधित विभागाकडून अहवाल येईपर्यंत थांबवण्यात आले होते. अहवालानंतर तपास सुरू करण्यात आला आहे, लवकरच या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माहिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली आहे.

स्थानिक नागरिक प्रसाद ठाकूर यांनी केली तक्रार!

माहिम येथील मोगल लेन या ठिकाणी दादोबा जगन्नाथ रिलीजस ट्रस्ट संचालित पुरातन श्री काशीविश्वेश्वर मंदिर आहे. माहिममधील या मंदिरात २३० वर्षांपूर्वीच्या पुरातन प्राचीन मूर्ती असून त्यापैकी पाषाणाच्या पाच मूर्ती गुढरीत्या गायब झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी स्थानिक नागरिक प्रसाद ठाकूर यांनी ५ जुलै २०१९ मध्ये माहिम पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी माहिम पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी या प्रकरणात चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना विनंती पत्र पाठवले होते. धर्मादाय उपआयुक्त यांनी या तपासकामी निरीक्षक दर्जाचे अधिकारी यांची नेमणूक करून तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

(हेही वाचा : पुण्यात मोदींच्या मंदिरानंतर आता पवारांचा पुतळा!)

२ मूर्तींचा लागला शोध!

धर्मादाय निरीक्षक यांनी या प्रकरणाचा तपास करून गायब झालेल्या ५ मूर्तींपैकी दोन मूर्तींचा शोध लावून त्याचा पंचनामा करून त्याचा अहवाल पाठवला होता. दरम्यान ठाकूर यांनी असा आरोप केला आहे की, माहिम पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी हा विषय धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा असून त्यांच्याकडून पोलिस ठाण्याकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात येईल, सध्या पोलिसानी दखल घेण्यासारखे काही नाही, असे कारण सांगून तपास बंद करण्यात आल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार!

दरम्यान या प्रकरणाची धर्मादाय विभागाने निरीक्षक यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात या पाषाण मूर्तीचा व्यवहार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिस तसेच धर्मादाय आयुक्त न्यायालय कार्यालयास केलेला गुन्हा लपवण्याच्या हेतूने खोटी माहिती तसेच बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे सिद्ध झाले असल्याचे अहवालात म्हटले असल्याचे ठाकूर यांनी लिहिलेल्या आरोपात म्हटले आहे. तसेच या प्रकरणात धर्मादाय उपआयुक्त आणि तक्रारदार ठाकूर यांनी संबंधित पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करावा, असे अहवालात सूचित करण्यात आले आहे. याप्रकरणी माहिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता प्रकरण बंद करण्यात आलेले नसून संबधित विभागाकडून अहवाल येईपर्यत थांबवण्यात आला होता व अहवालानंतर तपास सुरू करण्यात आला असून लवकरच या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती माहिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.