लसीकरणात मुंबईचा नवा विक्रम! कोणता तो जाणून घ्या… 

एकट्या सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार १५७ डोस दिले गेले.

136

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून १६ जानेवारी २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ७ वाजेपर्यंत) या कालावधीत कोविड-१९ प्रतिबंधक लशीच्या १ कोटी २३ लाख ११ हजार ५४१ इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला या कालावधीत एकूण ७७ लाख ६२ हजार ४७० लसींचा साठा प्राप्त झाला. त्यातून आजवर ७६ लाख ९६ हजार ८३३ एवढ्या मात्रा देण्यात आल्या. मुंबईकर नागरिकांचे लसीकरण अत्यंत वेगाने करण्यात येत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांचा विचार केला तर वेगाने लसीकरण करण्याबाबत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.महापालिकेचा हा नवा विक्रम आहे.

सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार दिले डोस!

अधिकाधिक मुंबईकर नागरिकांचे आणि सर्व समाज घटकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या अथक प्रयत्नांचा परिपाक म्हणून सप्टेंबर २०२१ या एकाच महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार १५७ डोस दिले गेले आहेत. यामध्ये शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचांही समावेश आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात सुमारे १० लाख लशींचा सरासरी साठा प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जवळपास दुप्पट म्हणजे १९ लाख २५ हजार १४० लससाठा प्राप्त झाला. तरीही संपूर्ण लससाठ्याचा विनियोग होईल, अशा रितीने लसीकरणाला वेग देण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

(हेही वाचा : महापालिकेच्या प्रत्यक्ष सभांची भीती कुणाला?)

लससाठा मिळताच २ ते ३ दिवसात विनियोग!

कोविड – १९ प्रतिबंध राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत १६ जानेवारी २०२१ पासून मुंबई महानगरात अधिकाधिक वेगाने व जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. लसीकरणाची व्याप्ती टप्प्या-टप्प्याने वाढू लागली तशी लस साठ्याची गरजही वाढली. प्रारंभीच्या काळामध्ये, पुरेसा लससाठा प्राप्त झाला नाही, त्या दिवसांसाठी लसीकरण नाईलाजाने बंदही ठेवावे लागत होते. मात्र आता पुरेसा लससाठा प्राप्त होत असल्याने त्याच वेगाने लसीकरण करण्याचे सातत्य टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लससाठा प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यापासून ते लससाठा मिळाल्यानंतर जलदगतीने लसीकरण करेपर्यंत महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अथक प्रयत्न व अचूक नियोजन करते आहे. लससाठा मिळताच त्याचा २ ते ३ दिवसात संपूर्ण विनियोग केला जातो. लससाठा साठवण क्षमता आणि लस देण्याची क्षमता या दोन्ही पैलुंचे बारकाईने नियोजन केल्याने लसीकरण वेगाची ही क्षमता साध्य झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.