पंजाबमध्ये काँग्रेसला खिंडार पडल्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे काय होणार, असा प्रश्न अवघ्या देशाला पडला आहे. काँग्रेसचे बुडते जहाज कसे तारायचे यावर अनेक जण खल करत असतानाच, राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून काँग्रेसला मोलाचा सल्ला दिला आहे.
काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी घेण्यासाठी खंबीर नेतृत्त्वाची गरज असून, पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. पंजाबातील परिस्थिती हाताळायला काँग्रेसकडे बडा नेता आहे का, असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.
(हेही वाचाः सिद्धूचा पंजाब अध्यक्षपदाचा राजीनामा! काँग्रेसची माघार की सिद्धूची खेळी? )
उप-यांवर विश्वास टाकायची गरज नाही
पंजाबात कॅ. अमरिंदर सिंग यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरुन दूर केल्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पेढे वाटले. पण नंतर स्वतःच अध्यक्षपदाचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या हाती उरले काय? काँग्रेस पक्षात मुळातच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उप-या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकायची गरज नव्हती, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसचा निर्णय चुकीचा असल्याचे सामनातून दाखवण्यात आले आहे.
‘यांच्या’ जोरावर काँग्रेस उसळी मारू शकेल?
काँग्रेसकडे गांधी पवार आहे, पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तो दूर करायला हवा. कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणीसारख्या तरुणांचा भरणा काँग्रेसमध्ये होत असला तरी त्यांच्या जोरावर काँग्रेस उसळी मारू शकेल काय?, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
राहुल गांधी डागडुजी करू इच्छितात, पण…
राहुल गांधी हे काँग्रेसच्या पडक्या वाड्याची डागडुजी करू इच्छितात पण काँग्रेसमधले जुने लोक त्यांना ते करू देत नाहीत. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करतात हे आता स्पष्ट झाले असल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांवर केला आहे.
(हेही वाचाः अमरिंदर सिंग नक्की आहेत कोण? नेटकरीही झाले संभ्रमित)
सेनापतीच नाही, तर लढायचे कसे?
त्यामुळे सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. काँग्रेसला पुन्हा उभे राहण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. पक्षाला सेनापतीच नसेल तर लढायचे कसे, डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा, असे प्रश्न विचारत सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सल्ला देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community