पंजाबात गेल्या काही दिवसांपासून घडणा-या घटनांमुळे काँग्रेस पक्ष अस्थिर झाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. काँग्रेस आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी झुंजत असताना राज्यातील त्यांचा मित्र पक्ष शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसला नवचैतन्याची लस देण्यात आली आहे.
केंद्रात भाजपाची ताकद असल्याने पक्षाला सूज आली आहे, पण काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच काँग्रेसचा हात धरुन मोठे झालेले नेते आता काँग्रेसची साथ सोडून त्यांना टाटा करत आहेत. अशा ज्येष्ठ नेत्यांवरही सामनाच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
(हेही वाचाः काँग्रेसकडे बडा नेता आहे का? काँग्रेसच्या नेतृत्त्वावरुन आता सामनातून सवाल)
काँग्रेसच्याच नेत्यांनी घेतली काँग्रेसला बुडवायची सुपारी
कॅ. अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपात जाणार, असे जवळजवळ पक्के झाले असतानाच त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. पण आपण काँग्रेसमध्येही राहणार नसल्याचे सांगत ते स्वतःचा पक्ष काढून काँग्रेसला खड्ड्यात टाकण्याची चिन्ह आहेत. पंजाबात हा गोंधळ सुरू असताना गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसचा हात सोडला. जितीन प्रसाद यांना काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद दिले ते भाजपात जाऊन उत्तर प्रदेशात मंत्री झाले. अमरिंदर, फालेरो यांना मुख्यमंत्रीपदासारखे सर्वोच्च पद देऊनही ते पक्ष सोडायला धजावतात हा निगरगठ्ठपणाचा कळस आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी ही काँग्रेसच्याच लोकांनी घेतली आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
मोदींच्या ‘वादळापुढे’ काँग्रेस ‘पतली’
गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नाही. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे आणि भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाली व काँग्रेसच्या वाड्यातील उरले सुरले वतनदारही सोडून चालले आहेत, असे स्पष्ट मत सामनातून मांडले आहे.
(हेही वाचाः सिद्धूचा पंजाब अध्यक्षपदाचा राजीनामा! काँग्रेसची माघार की सिद्धूची खेळी? )
काँग्रेस पक्ष आजारी
भाजपाकडे आज मंत्रीपदे वाटण्याची क्षमता आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहेत. याला सूज येणे असे म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी उपचारही सुरू आहेत, पण ते चुकीचे आहेत का याचा विचार व्हायला हवा, असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
काँग्रेस नेतृत्त्वास कधी उमगणार?
काँग्रेसने उसळी मारुन उठावे, मैदानात उतरावे, राजकारणात नवचैतन्याची बहार आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळणे शक्य नाही. काँग्रेसशिवाय भाजपास जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते, हे काँग्रेस नेतृत्त्वास कधी उमगणार, असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
(हेही वाचाः अमरिंदर सिंग नक्की आहेत कोण? नेटकरीही झाले संभ्रमित)
Join Our WhatsApp Community