मी… उद्धव बाळासाहेब ठाकरे… राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… हे वाक्य संपूर्ण राज्याने ऐकले असेलच. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली. आता या घटनेला दोन वर्षे पूर्ण होतील. एव्हाना संपूर्ण देशाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हे माहीत असतील. पण उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच खासदाराला मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि तेही उद्धव ठाकरे असल्याचा विसर पडला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाच राज्याचे मुख्यमंत्री करुन टाकले.
(हेही वाचाः अनिल परबांचे कार्यालय तोडायची ऑर्डर आली…रामदास भाई म्हणाले ‘वाव…व्हेरी गुड!’)
नेमकं घडलं तरी काय?
खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील कोल्हापूर-सिंधुदुर्ग आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. आंजिवडे येथे मीडियाशी बोलताना राऊत यांनी आघाडी सरकार मधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख चक्क राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केला. रस्ते विकासाच्या कामासंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती देताना, “या रस्त्यांसंदर्भात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे बाजू मांडलेली आहे. त्यांनीही तत्वत: मंजूरी दिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत”, असे विनायक राऊत म्हणाले.
(हेही वाचाः विनायकाच्या मते नारायण ‘अज्ञानी’)
निलेश राणेंची टीका
या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्वीट केला असून, त्यांनी विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊतला अद्याप माहिती नाही राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. टोपी तरी धड घालायची, नव्वदच्या दशकात सिनेमा टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅक करणारे जी टोपी घालायचे तशीच टोपी राऊतांनी घातल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Communityशिवसेना खासदार विनायक राऊतला अद्याप माहिती नाही राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. टोपी तरी धड घालायची, नव्वदच्या दशकात सिनेमा टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅक करणारे जी टोपी घालायचे तशीच घातली आहे. pic.twitter.com/IfvQYmP3Uk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 2, 2021