काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला होता. आता आणखी उत्तर भारतीय मतदारांचे नेतृत्व करणारा ‘बिहारी बाबू’ नेता भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अंधेरी येथे राहणारा हा नेता भाजपामध्ये येण्यास इच्छुक असून, लवकरच तो भाजपामध्ये डेरेदाखल होईल, अशी माहिती भाजपामधील एका वरिष्ठ नेत्याने हिंदुस्थान पोस्टशी खासगीत बोलताना दिली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपामध्ये लवकरच प्रवेश करणाऱ्या या नेत्याने देखील मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.
(हेही वाचाः उत्तर भारतीयांची ‘कृपा’ भाजपवर होणार का?)
पालिका निवडणुकीआधी होणार प्रवेश?
पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली असून, त्यासाठी भाजपा आतापासूनच तयारीला लागली आहे. त्यातच भाजपाचा डोळा हा उत्तर भारतीय मतांवर असून, याचसाठी मुंबई अध्यक्ष राहिलेल्या या नेत्यासोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यासोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, पालिका निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत भाजपा आहे.
(हेही वाचाः ‘या’ शिवसेना खासदाराच्या मते अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री)
म्हणून त्या नेत्याला भाजपामध्ये प्रवेश
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेसचा हा उत्तर भारतीय नेता सातत्याने शिवसेनेवर टीका करताना पहायला मिळत आहे. हा नेता पक्षात आल्यास भाजपाची मुंबईतील ताकद आणखी वाढू शकते. एवढेच नाही तर 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघात भाजपाला या नेत्याच्या रुपाने तगडा उमेदवार देखील मिळणार आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना या नेत्याने मुंबईतील विविध मुद्द्यांना हात घालत सत्ताधारी शिवसेनेला जेरीस आणले होते. या सर्व गोष्टींचा फायदा बघता या नेत्याला भाजपामध्ये प्रवेश देऊन सन्मानाचे पान दिले जाऊ शकते.
(हेही वाचाः अनिल परबांचे कार्यालय तोडायची ऑर्डर आली…रामदास भाई म्हणाले ‘वाव…व्हेरी गुड!’)
Join Our WhatsApp Community