राज्यातील पूरपरिस्थितीची अनेक राजकीय नेते पाहणी करत आहेत. यावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना देखील महापूर आल्याचे पहायला मिळत आहे. राज्यात दोन्ही गृहांच्या विरोधी पक्षनेत्यांबरोबरच भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील मराठवाड्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, त्यांना त्यांच्याच एका जुन्या विधानाची आठवण करुन दिली आहे.
नशीबाने तेच आता मुख्यमंत्री आहेत त्यामुळे…
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना पूरग्रस्त भागांचे पंचनामे काय करता आधी मदत जाहीर करा, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे आता नशीबाने तेच उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच विधानानुसार पंचनाम्यांपेक्षा शेतक-यांना थेट एकरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, आधी मदत करा! राज ठाकरेंचे राज्य सरकारला पत्र)
केंद्राआधी राज्य सरकारने मदत करावी
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी चिंतेत आहेत. परभणी जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांसाठी राज्य सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी असे सांगितले. केंद्र सरकार मदत करेलच पण आता तात्काळ मदत करणे हे राज्य सरकारचे, कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचाः मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन)
Join Our WhatsApp Community