सोमवार 4 ऑक्टोबर पासून राज्यात तब्बल दीड वर्षांनी शाळेचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळेलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून शिक्षक व शाळा व्यवस्थापनांना अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. पण त्याबरोबरच विद्यार्थी ाणि पालकांनी घ्यायची काळजी सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली आहे.
त्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करुन स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवणण्याचे आवाहन पालक व विद्यार्थांना करण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
(हेही वाचाः दीड वर्षांनी शाळा भरली! शाळेच्या पहिल्या दिवसाचे फोटो इथे शेअर करा… शिक्षणमंत्र्यांचे आवाहन)
असे आहेत नियम
- आपले दप्तर भरताना शालेय वस्तूंसोबतच सॅनिटायझरची बाटली जरुर भरा
- शाळेत जाण्यासाठी तयार होताना तोंडावर मास्क घालणे विसरू नका
- शाळा घराजवळ असेल तर चालत किंवा सायकलने जा
- बसने जाता एका सीटवर एकाच विद्यार्थ्याने बसा, पूर्ण वेळ मास्क वापरा
- शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटताना शारीरिक अंतर पाळा
- शाळेत येताना शाळेतील कर्मचा-यांना विद्यार्थ्यांचे तापमान मोजू द्या
- वर्गात प्रवेश करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करा
- नेमलेल्या बाकांवरतीच बसा, मित्रांसोबत जागेची अदलाबदल करू नका
घंटा वाजला. शाळा सुरू झाली. #चलामुलांनोचला तयार व्हा, शाळेत जाऊया. #BackToSchool #शाळेचापहिलादिवस pic.twitter.com/zdZhAT7nBd
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 4, 2021
अशी आहे परवानगी
- ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी व शहरी भागांत 8 वी ते 12वी पर्यंत शाळेचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
- शाळेत येण्याची कुठल्याही विद्यार्थ्यावर सक्ती नसून, पालकांची संमती आवश्यक असणार आहे.
- कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांवर बंधनकारक असणार आहे.
- शाळेत कुठल्याही खेळांना परवानगी असणार नाही.
- शाळा सुरू करण्यासंदर्भातले सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत.
- जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नाही त्यांचे शिक्षण बंद न राहता ऑनलाईन शाळा सुरू राहतील.