खासगी-सार्वजनिक भागीदारीतून मुंबईत उभारणार चार्जिंग स्टेशन

महापालिकेने २०२३ पर्यंत ५० टक्के सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

138

राज्य शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला अनुसरुन बेस्ट उपक्रमाची वाटचाल सुरू आहे. बेस्टच्या ताफ्यामध्ये यापुढे इलेक्ट्रीक वाहनेच समाविष्ट केली जातील. महानगरामध्ये इलेक्ट्रीक वाहने विद्युतभारित (चार्ज) करण्यासाठी सुमारे ५५ ठिकाणे निवडली आहेत. तेथे खासगी-सार्वजनिक भागीदारीतून येत्या ३ ते ४ महिन्यांत चार्जिंग स्टेशन उभे राहतील. यामुळे सर्वसामान्य जनतेलाही वाहने चार्ज करण्याची सुविधा मिळेल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी स्पष्ट केले.

नागरिकांसाठी बस सेवा होणार ‘बेस्ट’ 

मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे तीन नवीन उपक्रम राज्य पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहेत. वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन आणि ई-बस मिशन असे हे तीन उपक्रम असून या तिन्ही उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जनतेला शाश्वत, किफायतशीर, उत्कृष्ट आणि सर्व परिसरांना जोडणारी अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा बेस्टच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी आमूलाग्र बदल होत असल्याचे यावेळी लोकेश चंद्रा यांनी सांगितले.

(हेही वाचाः आदित्य ठाकरेंना वाटते सर्व पक्षांनी एकत्र यावे… का ते जाणून घ्या)

महापालिकेचे लक्ष्य

खासगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित संस्थांसमवेत सामंजस्य करार केल्याने, जगभरात जे सर्वोत्कृष्ट कार्य अशा संस्थांद्वारे होते ते तंत्रज्ञान, अनुभव महापालिका प्रशासनाला मिळू शकणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मनोगतात नमूद केले. शासनाने २०२५ पर्यंत १५ टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याहीपुढे जाऊन महापालिकेने २०२३ पर्यंत ५० टक्के सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

महापालिकेची योग्य दिशेने वाटचाल

वातावरण बदल व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा जनतेचा प्रत्यक्ष प्रेरक सहभाग वाढवण्यासाठी मोलाचा आहे, असे आयुक्तांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी मुंबई महापालिका प्रशासन योग्य दिशेने पुढे जात असल्याचा आत्मविश्वासही चहल यांनी व्यक्त केला.

(हेही वाचाः पूर्व उपनगरवासियांना मुलुंडला हवे आरटीओ कार्यालय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.