राज्यसभेतील खासदार ‘दांडीबहाद्दर’? केवळ इतकेच सदस्य असतात कायम ‘हजर’

संसदेच्या सत्रांच्या सर्व दिवसांमध्ये सभागृहाच्या प्रत्येक बैठकीच्या वेळी सरासरी केवळ 30 टक्के सदस्य उपस्थित होते.

140

देशाच्या संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणून राज्यसभेला ओळखलं जातं. कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत राज्यांचं प्रतिनिधीत्व करणे हे या सभागृहातील सदस्यांचे महत्त्वाचे काम आहे. पण राज्यसभेत सरासरी फक्त 78 टक्के खासदारच नेहमी उपस्थित असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. राज्यसभेच्या सदस्यांची उपस्थिती पाहून त्यांचे कामाप्रती असलेले गांभीर्य पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सभागृहाचे सभापती एम.व्यंकय्या नायडू यांच्या आदेशानुसार सभागृहाच्या कामकाजात सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग पाहण्यासाठी ही मोजणी करण्यात आली. 2019 पासून 2021च्या पावसाळी अधिवेशनापर्यंत झालेल्या सात सत्रांमधील एकूण 138 बैठकांमधील सदस्यांची उपस्थिती या अहवालात मोजण्यात आली.

(हेही वाचाः अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवले, तर केंद्र सरकार देणार पैसे! अशी आहे योजना)

प्रत्येक बैठकीला सरासरी 30 टक्के हजेरी

राज्यसभेचे खासदार त्यांच्या कालावधीत किती गंभीरपणे काम करतात हे पाहण्यासाठी सदस्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत बैठकांमध्ये लावलेल्या हजेरीची टक्केवारी काढण्यात आली. या टक्केवारीनुसार, राज्यसभेतील सरासरी 78 टक्के सदस्यांनीच बैठकांना कायम हजेरी लावली आहे. या अहवालानुसार, संसदेच्या सत्रांच्या सर्व दिवसांमध्ये सभागृहाच्या प्रत्येक बैठकीच्या वेळी सरासरी केवळ 30 टक्के सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे, तब्येतीच्या आणि इतर कारणांमुळे दोन टक्क्यांपेक्षा कमी सदस्यांनी संपूर्ण कालावधीत एकदाही सभागृहातील बैठकींना हजेरी लावली नाही.

असा आहे सदस्यांचा हजेरी पट

राज्यसभा सचिवालयाने सदस्यांच्या उपस्थितीचे गेल्या सात सत्रांमध्ये म्हणजेच 2019 च्या 248 व्या सत्रापासून आणि 2021 च्या शेवटच्या 254 व्या पावसाळी अधिवेशनापर्यंत विश्लेषण केले. या कालावधीत झालेल्या 7 सत्रांमध्ये एकूण 138 बैठका झाल्या. 254 व्या सत्रात(पावसाळी अधिवेशन) सर्वाधिक 82.57 टक्के दैनिक उपस्थिती नोंदवली गेली होती, तर त्यापूर्वीच्या(253 व्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात) 72.88 टक्के इतकी कमी नोंद झाली होती. या काळात 29.14 टक्के लोकांनी 100 टक्के उपस्थिती नोंदवली.

(हेही वाचाः एनसीबीचे ‘ऑपरेशन कॉर्डिलीया क्रूझ’… वाचा संपूर्ण कारवाईचा ‘थरार’)

या खासदारांचा हजेरी पट चांगला

वरिष्ठ सभागृहाचे फक्त एक सदस्य एस.आर.बालसुब्रमण्यम, गेल्या 7 सत्रांच्या सर्व 138 बैठकांना उपस्थित राहिले. ते अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK)च्या वतीने राज्यसभेत सध्याचे खासदार आहेत. त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे भाजपा खासदार टी.जी. व्यंकटेश आणि टीडीपी खासदार के. रवींद्रकुमार यांचाही सभागृहातील उपस्थितीचा चांगला रेकॉर्ड होते.

कमीत-कमी इतके सदस्य उपस्थित असणे आवश्यक

संविधानात सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या प्रत्येक बैठकीवेळी पिठासीन अध्यक्षांकडून गणपूर्ती मोजली जाते. ही गणपूर्ती सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 1/10 असणे गरजेचे असते. त्यानुसार राज्यसभेत 25 आणि लोकसभेत 55 सदस्य बैठकीला उपस्थित असणे गरजेचे असते. जर यापेक्षा कमी सदस्य उपस्थित असल्यास सभागृहाचे कामकाज स्थगित केले जाते.

(हेही वाचाः ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे मुख्यमंत्री संतप्त, रामदास भाईंवर कारवाई करणार?)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.