ऊर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेत विद्यार्थी का आहेत नाराज?

महावितरण कंपनीची विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून, कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे.

133

ऊर्जा विभागाने नुकताच विद्युत सहायक भरतीचा निकाल जाहीर केला. त्यात ४,५३४ उमेदवारांची निवड करण्यात आली. मात्र यावरुन काही विद्यार्थी नाराज झाले असून, ज्यांना चांगले टक्के आहेत त्यांचे नुकसान झाल्याचा आरोप विद्यार्थी आता करू लागले आहेत. बेस्ट ऑफ फाईव्हमुळे चांगले टक्के असूनही आमचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आता विद्यार्थ्य़ांकडून येऊ लागली आहे. दरम्यान न्यायप्रविष्ट असलेले आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील ४,५३४ उमेदवारांची निवड यादी जाहीर केल्याचे ट्विट उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले होते.

विद्यार्थ्यांनी घेतली राज्यमंत्र्यांची भेट

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. महावितरण कंपनीची विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून, कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल त्यांना नियमानुसार अपात्र घोषित करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन प्राजक्त तनपुरे यांनी दिले. एचएसबीसी, फोर्ट येथील महावितरण सूत्रधार कंपनीच्या इमारतीमध्ये राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी, ४ ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्त्तरे देवून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारांचे समाधान केले.

(हेही वाचा : आर्यन खानमुळे बॉलिवूडचे अनेकजण एनसीबीच्या रडारवर!)

काय म्हणाले तनपुरे?

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते. याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चूक झाली नसल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले. सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफ, राखीव जागा, आरक्षण, गुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही. भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.