दहिसर नदीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी त्यातील सांडपाण्याला अटकाव करत अत्याधुनिक पध्दतीचे मलनि:सारण प्रक्रिया केंद्र उभारुन मलवाहिनीतील पाणी त्यात फिरवले आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर याच पध्दतीने जलप्रदूषण रोखण्याचा ओशिवरा/वालभट नदीच्याही प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ओशिवरा/वालभट नदीबाबत न्यायालयात याचिका असल्याने भाजपाने याला विरोध केला. परंतु भाजपाच्या विरोधानंतरही समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
दहिसर आणि वालभट/ओशिवरा नदीतील प्रदूषणास अटकाव व आळा बसावा तसेच परिसरातील रहिवाशांचे आरोग्य व राहणीमान सुधारण्यासाठी महापालिकेच्यावतीने नदीच्या पुनरुज्जीविकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार नदीच्या काठावर असलेल्या वसाहतींमधून येणाऱ्या सांडपाण्याला रोखण्यासाठी नदीलगतच्या पोहोच रस्त्यावर मलनि:सारण वाहिनी टाकून उदंचन (पंपिंग स्टेशन) केंद्रापर्यंत सांडपाणी वाहून नेणे, नदी लगतच्या झोपडपट्टयांमध्ये मलनि:सारण वाहिनी टाकणे शक्य नसल्याने झोपडपट्टीमधून नदीमध्ये येणाऱ्या सांडपाण्यास प्रतिबंध करण्यासाठी इंटरसेप्टर बसवणे आणि नव्याने बनवण्यात येणाऱ्या मल प्रक्रिया केंद्रात वळवणे. तसेच मलजल प्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी पावसाळ्याव्यतिरिक्त पुनश्च नदीमध्ये सोडून नदी प्रवाहीत ठेवणे, नदीच्या काठांवर जेथे उपलब्ध नसेल तिथे पोहोच रस्ता बनवणे व पोहोच रस्त्याखाली मलनि:सारण वाहिनी टाकणे आदी कामांचा समावेश होता.
नदीच्या विकासाचा मार्ग खुला!
याबाबतचा दहिसर नदीचा प्रस्ताव मागील स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला होता. परंतु ओशिवरा/वालभट नदीचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. याबाबत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती देण्यात यावी, असे निर्देश देत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला होता. परंतु मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव अध्यक्षांनी पुकारताच भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याला विरोध दर्शवला. याबाबत न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना हा प्रस्ताव मंजू करू नये, अशी सूचना त्यांनी केली. परंतु त्यानंतरही अध्यक्षांना हा प्रस्ताव संमत केला. त्यामुळे दहिसरनंतर आता ओशिवरा/वालभट नदीचाही प्रस्ताव मंजूर झाल्याने आता या नदीच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे.
(हेही वाचा : फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टा बंद पडणारा सापडला! कोण आहे ‘तो’?)
दहिसर नदी
- एकूण लांबी : १३ मीटर
- एकूण रुंदी : ३० मीटर ते ४५ मीटर
- नदीच्या रुंदीकरणाचे व संरक्षक भिंतीचे काम : ९० टक्के
- नदीपर्यंतच्या पोहोच मार्गाचे काम : ७० टक्के
- नदीतील सांडपाणी रोखून मलजल प्रक्रियेत सोडण्याचा खर्च : ३७६.०५ कोटी रुपये
- निविदेत पात्र ठरलेले कंत्राटदार : एस.के-एस.पी असोशिएट्स
- सल्लागाराचे नाव : टंडन अर्बन सोल्यूशन
वालभट/ओशिवरा नदी
- एकूण लांबी : ७.३१० मीटर
- एकूण रुंदी : १० मीटर ते ६९ मीटर
- नदीतील सांडपाणी रोखून मलजल प्रक्रियेत सोडण्याचा खर्च : ९२८.४६ कोटी रुपये
- निविदेत पात्र ठरलेले कंत्राटदार : इगल-महालसा (जे.व्ही)
- सल्लागाराचे नाव : टंडन अर्बन सोल्यूशन