स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की ‘रक्त महोत्सव?’ सामनातून केंद्र सरकारवर आगपखड

देश नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला जाऊ नये म्हणून लढणा-या शेतक-यांना चिरडून मारणा-या सरकारचा धिक्कार असो.

153

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हत्याकांडाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्र सरकारवर गेले काही दिवस शाब्दिक हल्ले करत आहेत. मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत देखील अनेकदा टीका करत भाजपासोबत शाब्दिक सामना छेडतात.

आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून लखीमपूर खेरी येथील घटनेचा निषेध करत पुन्हा एकदा केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या संघर्षाचे गौरव गीत गातानाच हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की शेतक-यांचे रक्त सांडणारा रक्त महोत्सव आहे, असा थेट सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

(हेही वाचाः धक्कादायक! लखीमपूरमध्येही खलिस्तान्यांचा सहभाग?)

…तर या राज्यांतील मुख्यमंत्र्यांचे राजीनामे भाजपाने मागितले असते

लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतक-यांचे हत्याकांड घडवले. त्याचे पडसाद संपूर्ण जगभर उमटले आहेत. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचा प्रयत्न योगी सरकारच्या पोलिसांनी केला आहे. त्या मंत्रीपुत्राने तो मी नव्हेच, असा आव आणला आहे. पण आता शेतक-यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडिओच समोर आला आहे. त्यामुळे आता सरकार काय करणार? असे प्रकरण पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळ या अभाजपाशासित राज्यांत घडले असते, तर त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने देशभर आंदोलन पुकारले असते, असा टोलाही भाजपाला सामनातून लगावण्यात आला आहे.

आवाज उठवला तर गळा आवळायचा प्रयत्न

लखीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना सरकारने रोखले आहे. त्यामुळे हे काय हिंदुस्था-पाकिस्तान सुरू आहे का, असा खडा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा असा प्रकार आणीबाणीच्या काळातही कधी घडला नव्हता. सरकारने कोणाचेही, कसेही मुडदे पाडायचे आणि विरोधकांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांचे गळे आवळायचा प्रकार सध्या देशात सुरू आहे, असा गंभीर आरोपही केंद्र सरकारवर सामनामधून करण्यात आला आहे.

(हेही वाचाः शेतकरी आंदोलन हिंसाचारः प्रियंका गांधींना अटक! ‘हे’ नेते नजरकैदेत)

देश खतरे मे हैं

लखीमपूर मधील लढाई राजकीय नसून ती जगभरातील शेतकरी आणि कष्टकरांच्या हक्काची आहे. ब्रिटीशांच्या काळात लाला लजपतरायांच्या नेतृत्त्वात शेतक-यांनी लढा दिला. तेव्हा ब्रिटीशांनी केलेल्या हल्ल्यात लालाजींचा मृत्यू झाला. परदेशी कापडाविरुद्ध आंदोलन करणा-या बाबू गेनूंवर ट्रक चालवणाराही ब्रिटीश होता. पण लखीमपुरात आपल्या हक्कासाठी आवाज उठवणा-या शेतक-यांवर भरधाव गाडी घालणारा स्वतंत्र हिंदुस्थानातील मंत्रीपुत्र आहे. त्यामुळे असे पाप जर सरकार करत असेल तर देश खतरे मे हैं, असेच म्हणावे लागेल, अशी टीका देखील सामनातून करण्यात आली आहे.

शेतजमीन विकायचा केंद्र सरकारचा डाव

देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतक-यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतक-यांचीच पोरे मरत आहेत. तीन कृषी कायद्यांवर वितार व्हावा असे त्यांना वाटते. पण सरकारला त्यांचे ऐकायचे नाही. सरकारला शेतीचे खासगीकरण करुन मर्जीतल्या उद्योगपतींना देशातील शेतजमीन विकायची आहे. देश नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला जाऊ नये म्हणून लढणा-या शेतक-यांना चिरडून मारणा-या सरकारचा धिक्कार असो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतक-यांच्या चिळकांड्या उडाल्या. त्यामुळे हा स्वातंत्र्याचा रक्त महोत्सव म्हणायचा का, असा झणझणीत सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

(हेही वाचाः राज्यसभेतील खासदार ‘दांडीबहाद्दर’? केवळ इतकेच सदस्य असतात कायम ‘हजर’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.