क्रूझवर झालेल्या छापेमारीनंतर केलेली कारवाई ही योग्य आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच करण्यात आली आहे. यामध्ये मनीष भानुशाली आणि के.पी. गोसावी हे दोघेही साक्षीदार होते, अशी माहिती एनसीबीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष समीर वानखेडे यांनी देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या आरोपांचे खंडण केले.
एनसीबीवरील आरोप बिनबुडाचे!
या कारवाईच्या वेळी ५ साक्षीदार होते. त्यामध्ये किरण गोसावी, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, प्रकाश बहादूर, मोईन इब्राहिम यांचा समावेश आहे. ही कारवाई करताना आम्ही सर्व नियमांचे पालन केले आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. त्यांनी या कारवाईच्या वेळी भाजपाचा पदाधिकारी मनीष भानुशाली आणि के.पी. गोसावी हे दोघे उपस्थित होते, असे सांगत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली, असा आरोप मलिक यांनी केला होता. तसेच याचा खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी याचा खुलासा करताना कारवाईच्या वेळी मनीष भानुशाली आणि के.पी. गोसावी ही दोघे साक्षीदार म्हणून उपस्थित होते, असे म्हटले. तसेच यासंबंधी एनसीबीवर जे आरोप होत आहेत, ते बिनबुडाचे आहेत. यासंबंधी आम्ही न्यायालयात माहिती देऊ, असे वानखेडे म्हणाले.
(हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : भाजपा नंबर १, महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ!)
Join Our WhatsApp Community