बंदच्या नावाखाली सरकारपुरस्कृत दहशतवाद! फडणवीसांचा हल्लाबोल

संपूर्ण सरकारी व्यवस्थेचा हा मोठा गैरवापर आहे.

152

11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण विरोधी पक्ष भाजपाकडून मात्र या बंदचा निषेध करण्यात येत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्र बंद पुकारुन महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍यांप्रती खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

(हेही वाचाः काकांचं दुःख सतावत आहे, त्याचंच तुम्हाला पित्त झालंय)

तेव्हा जालियनवाला बाग आठवत नाही?

हे पूर्णत: ढोंगी सरकार आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलंच, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, राज्यात 2 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. त्यांना ना कर्जमाफीचा लाभ, ना कोणती मदत. अशात त्यांना मदत द्यायचे सोडून सरकारपुरस्कृत दहशतवाद या नेत्यांनी हाती घेतला आहे.

निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने जनतेला बंद करण्यासाठी भाग पाडले जात आहे. संपूर्ण सरकारी व्यवस्थेचा हा मोठा गैरवापर आहे. मावळमध्ये निष्पाप शेतकर्‍यांवर गोळीबार होतो, राजस्थानमध्ये शेतकर्‍यांना लाठ्या-काठ्यांनी तुडवले जाते, तेव्हा यांना जालियनवाला बाग आठवत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ‘बंद’ सरकार

या सरकारने सार्‍या योजना बंद केल्या, अनेक योजनांना स्थगिती दिली. गेले दीड वर्ष बंदच पाळला. पण आता कुठे थोडी शिथिलता देऊन व्यवहार उघडले जात असतानाच अचानक बंद घोषित करण्यात आला आहे. हे अख्खं सरकारच ‘बंद सरकार’ आहे, अशी बोचरी टीकाही फडणवीस यांनी केली.

(हेही वाचाः महाराष्ट्र बंद : उत्स्फूर्त की जबरदस्ती?)

मविआ नेत्यांकडून वसुली केली पाहिजे

आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलिसही बघ्याची भूमिका घेत तमाशा पाहतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. या सरकारमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल आणि यांना खरोखर शेतकर्‍यांप्रति कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.