बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आणखी नव्या मालमत्तेचा शोध मुंबई पोलिसांना लागला आहे. नाशकात ही मालमत्ता असून ती संजय पुनुमिया याच्या नावाने खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाने खरेदी केली मालमत्ता
संजय पुनुमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असून त्याचे परमबीर सिंह यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे याआधीच उघड झाले आहे. पुनुमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली आहे. धारणगाव, मिरगाव, पाथरे या गावांमध्ये त्याने कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे समजते. ही जमीन पुनुमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्यामुळे पुनुमियाला हे सर्व करणे शक्य झाले. विशेष म्हणजे पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीर सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने आता सिन्नरमध्ये एक तक्रारही दाखल झाली आहे. या साऱ्या प्रकरणाची तक्रार आता सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कोठडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : समीर वानखेडे आणखी ६ महिने गाजवणार कारकीर्द!)
Join Our WhatsApp Community