राज्याचे माजी महसूल मंत्री व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा दणका बसला आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. खडसे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, त्याबाबत न्यायालयात सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबतची माहिती दिली. दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून, त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ABA rejected as it is not maintainable. Mandakiniji's lawyer sought time off 3 weeks to move higher court that too was rejected
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 12, 2021
न्यायालयाने अर्ज फेटाळला
पुणे येथील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर खडसे अडचणीत येऊन त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावेळी त्यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने आता तो अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झालं असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
Join Our WhatsApp Community