राज्य सरकारची आता काळी पत्रिका निघणार!

येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू, असे आशिष शेलार म्हणाले.

212

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराची कुंडली मांडणारी काळी पत्रिका भारतीय जनता पक्ष काढणार आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या गैरकारभाराची जंत्री असेल, ती जनतेसमोर आणून या सरकारचा चेहरा उघडा करण्यात येणार आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी माहिती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी दिली.

सरकारला सळो की पळो करू!

आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा सरकारचा प्रयत्न सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनता त्याला थारा देणार नाही, असा घणाघात करत महाराष्ट्रातील जनतेला जी मदत, सेवासुविधा आवश्यक आहे ती मिळत नाही, विकास करू शकत नाही, शेतकरी समाधानी नाही, विद्यार्थी रिकामे आहेत, दलित समाजाच्या बंधू-भगिनींना काही मिळत नाही, मराठा समाज निराश आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा ठरवली आहे. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू, असा दावाही केला.

(हेही वाचा : एसटीत आत्महत्येचे सत्र सुरूच! २३व्या आत्महत्येने महामंडळ हादरले!)

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची बैठक केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाली. केंद्रीय प्रभारी सी.टी रवी, पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शुक्लाजी, सह प्रभारी पवय्या, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठक झाली. राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा आज आम्ही घेतला. पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे राज्यातील 97 हजार 315 बुथपैकी 92 हजार 891 बुथपर्यंतची रचना लागलेली आहे. एक बुथ प्रमुख आणि बरोबर समिती अशी याची संपूर्ण रचना आहे. आज अतिशय विनम्रतेने हे सांगावेसे वाटते की, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर भाजप हा एकमेव पक्ष चांदा ते बांदा काम करतो आहे, असेही शेलार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.