गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात एक नंबर कोण? याचा खुलासा झाला असला तरी खात्री करण्यासाठी सचिन वाझे याची कस्टडी मुंबई गुन्हे शाखेला हवी आहे. यासाठी गुन्हे शाखेने एनआयए विशेष न्यायालयाकडे वाझेच्या कस्टडीसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर २२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
परमबीर सिंग आलेच नाही!
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यासह काही जणांविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखेने नुकतेच परमबीर सिंग यांना समन्स जारी केले असून १३ ऑक्टोबर रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र १३ तारीख उलटून गेली असून परमबीर सिंग हे आलेच नाही.
(हेही वाचा : महापालिकेच्या प्रत्यक्ष सभांच्या आड कोण?)
न्यायालयात सिद्ध करावे लागणार!
या गुन्ह्यातील एफआयआरमध्ये सतत एक नंबरचा उल्लेख केला गेला आहे. एक नंबर म्हणजेच परमबीर सिंग हे जवळजवळ उघड झाले असून काही साक्षीदारांच्या साक्षीत देखील एक नंबर हे परमबीर सिंग असल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीने खंडणी घेताना वारंवार एक नंबरचा उल्लेख ती व्यक्ती म्हणजे सचिन वाझे असून तो देखील या गुन्ह्यात आरोपी आहे. एक नंबर म्हणजेच परमबीर सिंग असल्याचा खुलासा झाला असला तरी ते न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहे, त्यासाठी ज्या व्यक्तीने या एक नंबरचा गुन्ह्यात वारंवार उल्लेख केला त्याचा जबाब महत्वाचा ठरणार आहे. ती व्यक्ती म्हणजे खुद्द सचिन वाझे. वाझे हा सध्या अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील मुख्य आरोपी असून तो न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने नुकतेच एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर २२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community