सुशांतसिंग राजपूत प्रकरणात चर्चेत आलेले नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले ते शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेमुळे! मात्र मागील काही दिवसांपासून आपल्या पाळतीवर गुप्तहेर लावून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.
समीर वानखेडेंवर राजकीय स्तरावर आरोप देखील करण्यात आले
एनसीबीचे समीर वानखेडे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या कारवाईचे कौतुक करण्यात येत असले तरी त्यांच्यावर राजकीय स्तरावर आरोप देखील करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या आईवर ओशिवरा येथील कब्रस्तान मध्ये रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे.
(हेही वाचा : भारत होणार अब्जाधिश! काय आहे कारण?)
मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी चौकशीचे आदेश दिले
वानखेडे हे दररोज कब्रस्तानमध्ये आईच्या थडग्यावर फुले वाहण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी जातात. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा संशय आल्यामुळे वानखेडे यांनी कब्रस्तानमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असत दोन अनोळखी इसम त्यांचा पाठलाग करीत कब्रस्तानपर्यंत आल्याचे दिसून आले. हे दोघे पोलिस असल्याचा संशय वानखेडे यांना असून त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. तसेच राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलिस विभागाचे एका वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन सीसीटीव्ही दाखवून लेखी तक्रार दाखल केली. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवणारे कोण आहे, त्यांचा उद्देश काय आहे याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. ही चौकशी अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community