मुंबईसह राज्यात सध्या कोविड लसीकरणाची चर्चा असून निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महापालिकेसह राज्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र, या लसीकरणाच्या मोहिमेबरोबरच मुंबई महापालिकेने रेबीज दिनाचे औचित्य साधून मागील १५ दिवसांत ३ हजार ४९३ भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण पार पाडले. मात्र, या भटक्या श्वानांबरोबर पाळीव श्वानांनाही वर्षातून एकदा ही लस देणे आवश्यक असून, श्वानप्रेमींनी आपल्या पाळीव श्वानाला रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्याचे आवाहन मुंबई महापलिकेने केले आहे.
लसीकरण मोहीम
दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात ‘रेबीज दिवस’ पाळला जातो. या अनुषंगाने मुंबई महापालिकेद्वारे २८ सप्टेंबर ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ या कालावधी दरम्यान रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती पंधरवडा पाळण्यात आला. या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या दरम्यान करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान ३ हजार ४९३ भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले.
(हेही वाचाः मुंबई महापालिकेचे ‘सुपर स्प्रेडर’ लसीकरण! कोण असणार लाभार्थी?)
स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य
यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या २ चमू कार्यरत होत्या. या चमूंमध्ये महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि श्वान पकडण्यासाठी अर्ध पशुवैद्यकीय कर्मचारी(Para Veterinary Staff) यांचा समावेश होता. तर पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये प्रामुख्याने प्राणीप्रेमी संस्था, द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स, मुंबई अॅनिमल्स असोसिएशन व पेट ओनर्स व अॅनिमल लव्हर फाऊंडेशन या संस्थांचा समावेश होता. तसेच श्वान पकडण्यासाठी महापालिकेच्या परिवहन खात्याद्वारे वाहने उपलब्ध करुन देण्यात आली होती, अशी माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे महाव्यवस्थापक डॉ. के. ए. पठाण यांनी दिली आहे.
नागरिकांना आवाहन
ज्यांच्या घरी पाळीव श्वान आहेत, त्यांनी आपल्या श्वानांना वर्षातून एकदा व निर्धारित दिवशी रेबीज प्रतिबंधात्मक लस ही पशुवैद्यकांकडून अवश्य द्यावी, असे या निमित्ताने महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या महाव्यवस्थापकांनी नागरिकांना आवाहन केले.
रेबीज लस कुणी विकसित केली
२८ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू हा रेबीज या रोगाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. त्याचबरोबर रेबीज या रोगाचा प्रतिबंध करणे आणि रेबीजचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या विविध स्तरीय उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. प्रसिद्ध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लुईस पाश्चर व त्यांच्या चमूने सर्वप्रथम रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली होती. याच अनुषंगाने मुंबई महापालिका क्षेत्रात रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती पंधरवडा पाळण्यात आला.
(हेही वाचाः शनिवारी फक्त महिलांसाठी लसीकरणाचा ‘जागर’)
Join Our WhatsApp Community