कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यापासून आता राज्य सरकारने निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली आहे. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनचा पास देण्यास सरकारने परवानगी दिली होती. आता दस-याच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून प्रवाशांना लोकल ट्रेनचे तिकीटही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा लोकल ट्रेनचा प्रवास आता अधिक सोपा होणार आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल ट्रेनचा पास देण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु नागरिकांना तिकीट देण्यात येत नव्हते. त्यामुळे एका दिवसासाठी प्रवास करणा-या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पण राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 ऑक्टोबरपासून प्रवाशांना लोकल ट्रेनचे तिकीट देण्यास सुरुवात झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर आता ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
शाळकरी मुलांना लोकल प्रवास
राज्य सरकारने आता १८ वर्षांखालील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑक्टोबरपासूनच विद्यार्थ्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना आपले ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे.
Join Our WhatsApp Community