प्रत्येक जन्मी मला शिवसैनिकांच्या रूपाने आई-वडील मिळावेत, याच महाराष्ट्रात माझा जन्म व्हावा आणि मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटू नये, असेच मला वाटते. काही जण म्हणायचे ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, आता म्हणतायेत ‘मी गेलोच नाही’, मग बस तिकडेच. ‘मी कुणीतरी आहे’ हा अहंपणा येऊ देऊ नकोस, नेहमी नम्रपणे रहा, अशी माझ्या आई-वडिलांची शिकवण, संस्कार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत ‘मागील दोन वर्षे मी एकही दिवस घरात राहिलो नाही, त्यामुळे मला मी मुख्यमंत्रीच आहे असेच वाटते’, असे वक्तव्य केले होते. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पलटवार केला.
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, हा शब्द आहे!
जर त्यांनी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता तर ते आज मुख्यमंत्री असते. मी हे पद जबाबदारी म्हणून स्वीकारले आहे. जर त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असते, तर मी कदाचित राजकारणातून बाहेर पडलो असतो. मी पुत्र म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ज्या दिवशी मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन, तेव्हाच मी शब्द पाळला असे होईल आणि तो शब्द पाळणारच, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
छापा – काटा खेळ जास्त दिवस चालणार नाही!
सरसंघचालक मोहन भागवत आणि मी जर हिंदुत्व एकच सांगत असू आणि आमचेच लोक ऐकत नसतील, तर हे मेळावे घेऊन फायदा काय? हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. देश हा माझा धर्म आहे, असे म्हणून वाटचाल करत असताना जर आमच्या वाटेत कुणी येत असेल तर कडवट हिंदुत्व घेऊन आम्ही उभे राहू. भागवत सांगतात सर्वांचे पूर्वज हिंदू होते. मग लखीमपूरला भर दिवसा शेतकरी मारले त्यांचे पूर्वज परग्रहातून आले होते का, हे सरसंघचालकांना पटते का? हिंदुराष्ट्र शब्द वापरातो तेव्हा त्यात सत्तेची लालसा नसते, असेही भागवत सांगतात, मग तुमच्या विचारातून बाहेर पडलेल्यांना तुमची शिकवणी लावा. सत्तेचे व्यसन या व्यसनाधीनतेला आळा कुणी घालणार आहे का? सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, मी आजही आव्हान करतो, पाडून दाखवा. छापा – काटा खेळ सुरु आहे, जास्त दिवस खेळ चालणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी वादाला सुरुवात! उद्धव ठाकरे करतील का खुलासा?)
दुसऱ्यांच्या कुटुंबावर आरोप करणे षंढपणा!
माझे भाषण संपल्यावर चिरकायला वाटच पाहत बसले आहेत. मी जनतेसाठी बोलत आहे. ठाकरे कुटुंबावर हल्ला करणारा जन्माला आला नाही, पण ठाकरे कुटुंबावर चिरकण्याची रोजगार हमी योजना सुरु आहे, माझा वाडा चिरेबंदी आहे. तो कधीच चिरणार नाही. परवा हर्षवर्धन पाटील ते भाजपात का गेले, यामागील कारण अनाहूतपणे सांगून गेले. खरेतर भाजपात गेलेले हे ब्रँड अँबेसिडर बनले पाहिजे, त्यांची जाहिरात केली, असेही ठाकरे म्हणाले. ही माणसे काय लायकीची आहेत, आमच्या अंगावर येत आहेत. स्वतःमध्ये धमक असेल तर अंगावर या, ईडी आणि सीबीआयने घेऊन येऊ नका. आव्हान द्यायचे आणि पोलिसांच्या मागे लपायचे, हे मर्दाचे लक्षण नाही. आम्ही देशभक्तीच्या पालखीचे भोई आहोत, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. वाईट काळात तुम्हाला सोबती चालत होता, आज तोच शिवसैनिक भ्रष्ट झाला. कुणाच्या कुटुंब, पत्नीवर आरोप करणे हे हिंदुत्व नाही, हा आकरमाशीपणा, षंढपणा आहे. वडिलोपार्जित शब्द संपत्ती वापरू द्या. छापा-काटा खेळता, काटा कसा बोचतो हे समजले नाही अजून तुम्हाला! दोन पोट निवडणूक झाल्या उमेदवार उपरे लागतात आणि म्हणतात जगातला मोठा पक्ष. प्लॅटफॉर्म वरील गर्दी आणि यांची गर्दी एकच आहे, असा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
Join Our WhatsApp Community