काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता आपली परीक्षा रद्द केली होती. आता पुन्हा नव्याने होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्या आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परिक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारत आहात, त्यांची संधी नाकारत आहात, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
काय म्हणाले पडळकर?
- काही दिवसापूर्वीच आरोग्य विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता आपली परीक्षा रद्द केली होती. कोरोनाच्या संकटात, विद्यार्थी कसे तरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते त्यांना माघारी पाठवले होते.
- सरकारी भरतींच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षाही यांनी सहा वेळा पुढे ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत, असे पडळकर म्हणाले.
- प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाच ताळमेळ नाही. इतके होऊन पुन्हा नव्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातला. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्या आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परिक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. त्यांची संधी नाकारताय.
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालते. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, पण या प्रस्थापितांचे सरकार निर्लज्जासारखे वावरत आहे.