राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक नियम शिथिल करत राज्यातील शाळा, कॉलेज, मंदिरे, सिनेमा आणि नाट्यगृहे टप्प्या-टप्प्याने सुरू केली आहेत. लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनच्या प्रवासाचीही मुभा देण्यात आली आहे.
पण आता याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. एक डोस घेतलेल्या नागरिकांना सुद्धा दिवाळीनंतर लोकल प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्यामुळे असे झाल्यास सर्वसामांन्यांसाठी तो मोठा दिलासा असणार आहे.
(हेही वाचाः ऑक्टोबरनंतर कोरोनाची तिसरी लाट…काय म्हणाले राजेश टोपे?)
मुख्यमंत्री घेणार निर्णय
दिवाळीनंतर लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना सुद्धा लोकल प्रवास तसेच मॉल्समध्ये प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. दिवाळीत कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घेऊनच हा निर्णय घेण्यात येईल, असे टोपे म्हणाले.
आरोग्य विभागाशी चर्चा करणार
यासाठी आरोग्य सेतू अॅपमध्ये नागरिक सेफ असल्याचे आढळल्यास एक डोस घेतलेल्या व्यक्तीला ही प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यामध्ये दिवाळीनंतरच्या कोरोना आकडेवारीनंतर आरोग्य विभागाशी चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.
(हेही वाचाः मुंबईत कोविड रुग्णांचा आकडा झाला ‘ट्रिपल थ्री’)
Join Our WhatsApp Community