शिवसेना म्हणतेय, भाजपाचे १५-२० नगरसेवक संपर्कात

त्यांना पक्षप्रमुख सन्मानाने पक्षात घेऊन त्यांना मानसन्मान देतील.

162

मुंबई महापलिकेच्या निवडणुकीचे फटाके दिवाळी पूर्वीच फोडण्यास सुरुवात झाली असून, शिवसेनेने भाजपाचे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तब्बल १५-२० नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. हे नगरसेवक भाजपाच्या नेतृत्वाला कंटाळले असल्याने ते येत्या डिसेंबरपर्यंत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मनस्थितीत आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी दिली आहे.

शिवसेना त्यांना आधार देणार

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे. भाजपाचे जे काही नगरसेवक आपल्या नेतृत्वाला कंटाळले आहेत आणि ज्यांना आपल्यावर अन्याय होतो असे वाटत आहे ते सर्व आमच्या शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत, त्यांना शिवसेनेचा आधार वाटत आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. त्यांना आमचा पक्ष नक्कीच आधार देईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(हेही वाचाः भाजपाचे नगरसेवक फोडण्याचा मुहूर्त जाहीर!)

पक्षप्रमुख बांधणार शिवबंधन

येत्या डिसेंबर महिन्यात १५ ते २० भाजपा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करताना दिसतील. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जे येतील त्यांना आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सन्मानाने पक्षात घेऊन त्यांना मानसन्मान देतील, असे जाधव यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षांनी फुसके बार हवेत सोडून स्वप्नरंजन करण्यापेक्षा मुंबईकर जनतेच्या समस्या सोडवाव्यात. जनतेच्या समस्या सोडवू शकत नाहीत, ते भाजपाचे नगरसेवक काय फोडणार? भाजपाचा एकही नगरसेवक नाराज नाही आणि तो पक्ष सोडून कुठेही जाणार नाही.  खोट्या बातम्या पसरवण्यापेक्षा महापौरांनी मुंबईकर जनतेला ‘१५ दिवसांत मुंबई खड्डेमुक्त’ करण्याचे जे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले याची माहिती द्यावी.
– प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते, मुंबई महापालिका

किती नगरसेवक शिवसेनेच्या जाळ्यात?

यापूर्वी शिवसेनेने मनसेचे ६ नगसेवक फोडून त्यांना आपल्या पक्षात घेतले होते आणि मनसे पक्ष महापलिकेत साफ करुन टाकला होता. आता शिवसेनेने भाजपाला टार्गेट केले असून, एका बाजूला भाजपाच इतर नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपाचे १५ ते २० नगरसेवक गळाला लाऊन ठेवले असून, डिसेंबरला हा गळ बाहेर काढला जाईल आणि नक्की किती नगरसेवक या जाळ्यात अडकले हे स्पष्ट होईल.

(हेही वाचाः आता भाजपचे ‘पदरा’आडचे राजकारण! सेनेचा घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.