मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार निधीच्या वापराचा शुभारंभ शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाने केला आहे. अंदाजे ४०० कोटींचा खर्च करुन शिवाजी पार्कचा परिसर विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळवून टाकण्यात येत आहे. परंतु या रोषणाईचे थेट इटली कनेक्शन असल्याचा शोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावला आहे. त्यामुळे आता हे इटली कनेक्शन आहे तरी काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हटले संदीप देशपांडे यांनी?
शिवतीर्थावरील रोषणाई आणि इटली कनेक्शन काय आहे, हे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे सांगितले. देशपांडे म्हणतात, ‘शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीच लांगुलचालन?’
शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 19, 2021
(हेही वाचा : ठाण्यात सेना-राष्ट्रवादीत रंगला ‘सामना’!)
कशी आहे शिवतीर्थावरील रोषणाई?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदार निधीच्या वापराची सुरुवात ही शिवतीर्थाच्या सुशोभिकरणाच्या माध्यमातून करण्याचे ठरवले. त्यानुसार दिवस-रात्र काम करू छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा परिसर विद्युत रोषणाईने उजळवून टाकण्यात आला. कंत्राटदाराने दसऱ्याच्या आधीच काम पूर्ण केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण दसऱ्याच्या दिवशी करण्यात आले. मात्र यासाठी कोट्यवधी रुपये किमतीचे दिवे लावण्यात आले आहेत आणि ते दिवे इटलीमधून आयात करण्यात आले असल्याचा दावा मनसेने केला. त्यावरून सत्तेसाठी इटलीशी व्यवहार करण्यामागे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मर्जी जपण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे का, असा अप्रत्यक्षपणे प्रश्न देशपांडे यांनी विचारल्याचे दिसत आहे.
Join Our WhatsApp Community