राज्यात अवकाळी पाऊस आणि ऑक्टोबर हिट याचा शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. राज्यात ज्या ग्रामीण भागातून शहराकडे भाज्यांचा पुरवठा होतो, तिथेच बदलत्या ऋतुमानाचा परिणाम झाल्याने भाजीपाल्यांची आवक घटली. त्यामुळे मुंबईत भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे. इथे कोथिंबिरीची एक जुडी थेट ८० ते ९० रुपयांवर पोहचली आहे. किरकोळ बाजारात गवार १०० ते १२० रुपये, तर वाटाणा १६० ते १८० रुपयांपर्यंत पोहचला आहे.
आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले
ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पाऊस चांगला झाला होता, उत्पादनही वाढले होते, त्यामुळे भाज्यांचे दर घसरलेले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली, अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले, भाज्यांची रोपे पाण्याखाली गेली. त्यामुळे साहजिकच भाज्यांचे उत्पादन घटले. ज्याचा थेट परिणाम भाज्यांच्या आवकवर झाला. बाजारात भाज्यांची आवकच घटली असल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात आठवड्यापूर्वी ३० ते ७० रुपये होता, सोमवारी तो ५० ते ९० रुपयांवर गेला आहे. तर किरकोळ बाजारात हाच दर १०० ते १२० रुपयांवर पोहचला आहे. हिरवा वाटाणा बाजार समितीमध्या ८० ते १४० रूपयाने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात तो १६० ते १८० रूपयाने विकला जात आहे. पुढील आठवडाभर भाज्यांचे दर हे चढ्या भावात असणार आहेत.
(हेही वाचा : यंदा पावसाचा वाढला मुक्काम! थंडीची एन्ट्री उशिरा)
सध्याचे दर
- गवार १००-१२०
- काकडी ४०-५०
- कोबी ३०-४०
- फरसबी ६०-८०
- गाजर ६०-८०
- कारली ५०-६०
- टोमॅटो ६०-८०
- कोथिंबीर ५०-८०