शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा समाचार भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तितक्याच आक्रमक शैलीत ‘प्रहार’मधून घेतला. ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, हे मी बाळासाहेबांना दिलेले वचन होते, पुत्रकर्तव्य म्हणून मी मुख्यमंत्री झालो आणि शब्द दिल्याप्रमाणे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच’, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच वचनबद्धतेवर राणे यांनी ‘प्रहार’ केला. दसरा मेळाव्यातील भाषणाची राणेंनी दैनिक ‘प्रहार’ मधील ‘हार आणि प्रहार नारायण राणे’ या सदरातून अक्षरशः चिरफाड केली.
तेव्हा पुत्रकर्तव्यास का जागले नाही?
मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा शब्द तुम्ही साहेबांना दिला, पण स्वतःच मुख्यमंत्री झालात, असा टोला हाणताना नारायण राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी काय काय थापा मारल्या. साहेबांना दिलेले वचन म्हणे पूर्ण केले. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा शब्द तुम्ही साहेबांना दिला. पण स्वत:च मुख्यमंत्री झालात. यापुढे शक्यच नाही. पण, भविष्यात चुकून संधी मिळाली, तर हे ठाकरे सोडून कोणालाच मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ. साहेबांनी घातलेली शपथ मोडून दोनदा घर सोडून हॉटेल हॉलिडे इनमध्ये राहायला गेलेले साहेबांचा शब्द काय पाळणार? शिवसैनिकांना कदाचित ही बनवाबनवी समजणार नाही. पण माझ्यासारखे अनेक लोक या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यावेळी मी मध्यस्थी केली नसती, तर आता आपण कुठे असता?, अशी आठवण करून देत ‘साहेबांच्या हयातीत जे पुत्रकर्तव्यास जागले नाहीत, ते साहेब गेल्यानंतर कसे काय पुत्रकर्तव्यास जागणार?’, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? ‘त्या’ रात्री काय घडले? राणेंनी केला धक्कादायक खुलासा)
केंद्रावर टीका हा दुतोंडीपणा!
दरम्यान नारायण राणे यांनी त्यांच्या या सदरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इतरही मुद्यावर कडक शब्दांत टीका केली. संघराज्यावर मुक्तपणाने चर्चा करायची म्हणतात. मग प्रत्येक आर्थिक प्रश्नाबाबत केंद्राकडे बोट दाखवायचे आणि पुन्हा केंद्र-राज्य संबंधांवर टीकाही करायची याला दुतोंडीपणा म्हणतात, असेही राणे म्हणाले. ज्या मोदीसाहेबांकडून आमदारकीची व त्या अनुषंगाने मुख्यमंत्रीपदाची भीक झोळीमध्ये घालून घेतली, त्यांच्यावर टीका करण्याचा यांना अधिकार आहे काय? सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे १९२५मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत, असे सांगत राणे यांनी हिंदुत्वाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणीही दोन्ही काँग्रेसकडे केली. तसेच शस्त्रपूजा म्हणून तुमची पूजा केली, असे हे शिवसैनिकांना सांगतात. त्यांच्या इस्टेटी जगभर पसरल्या, सामान्य शिवसैनिक मात्र कफल्लकच राहिला, अशीही जहरी टीका राणेंनी केली.
Join Our WhatsApp Community