सध्या बेपत्ता असलेले माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या ऍट्रॉसिटी गुन्ह्याच्या अंतर्गत त्यांना आम्ही अटक करणारच, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात घेतली. तसे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात सादर केले.
पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यावर ॲट्राॅसिटी कायद्याच्या व भारतीय दंड संहितेच्या काही कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तो रद्द करण्यासाठी सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बुधवारी या याचिकेवरील सुनावणी न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर झाली, तेव्हा राज्य सरकारच्या वतीने युक्तीवाद करताना ॲड. डी. खंबाटा म्हणाले की, सध्याची परिस्थिती बदलली आहे. ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या व बेपत्ता झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याला कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याचे आश्वासन देऊ शकत नाही. परमबीर सिंह बेपत्ता आहेत आणि अशा स्थितीत आधी दिलेले आश्वासन राज्य सरकार कायम ठेवू इच्छित नाही.’
(हेही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? ‘त्या’ रात्री काय घडले? राणेंनी केला धक्कादायक खुलासा)
परमबीर सिंहांवर खंडणीचे ४ गुन्हे
परमबीर सिंह यांना अद्याप ‘फरार’ म्हणून घोषित करण्यात आले नाही. या प्रकरणी त्यांना दोनदा समन्स बजावण्यात आले आणि त्या समन्सला त्यांनी उत्तर दिले आहे,’ असे परमबीर सिंह यांच्यातर्फे ॲड. महेश जेठमलानी यांनी सांगितले. यावरील सुनावणी पुढील आठवड्यात होईल. परमबीर यांच्यावर ठाणे व मुंबईत किमान चार खंडणीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व गुन्हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे आपल्यावर करण्यात येत आहेत, असे सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community