भारतातील या चिमुकलीने ‘मूर्ती लहान कीर्ती महान’ ही उक्ती ख-या अर्थाने सार्थ ठरवली आहे. अवघ्या ४ वर्षांच्या शर्विका म्हात्रेने गुजरातमधील गिरनार शिखर सर करत, आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. लहानगी बालगिर्यारोहक शर्विका म्हात्रे मूळची रायगडची रहिवासी असून, ती वयाच्या दीड वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पायी चालत जाऊन सर करत आहे.
गिरनार शिखर सर
गिरनार हे गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वात उंच शिखर(१ हजार ११७मी.) आहे. हे शिखर सर करण्यासाठी १० हजार पाय-यांचा टप्पा पार करावा लागतो. शर्विकाने १८ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता प्रवासाला सुरुवात करुन, १७ तासांत हा टप्पा पूर्ण केला. १९ ऑक्टोबरला कोजागिरीच्या पहाटे चार वाजता कामगिरी पूर्ण करत तिने गिरनार पर्वतावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला. यामुळेच शर्विकावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
(हेही वाचाः आठ वर्षांच्या मुलाने केले ‘हे’ सर्वोच्च शिखर सर)
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
गिर्यारोहण सर करतानाचे व्हिडिओ व रितसर कागदपत्रे तपासून वयाच्या तिस-या वर्षी शर्विकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात कमी वयाची बालगिर्यारोहक म्हणून नोंद झाली. भविष्यात तिला उत्तम गिर्यारोहक बनवण्याचा तिच्या पालकांचा मानस आहे. याआधी आंध्र प्रदेशातील कुरनूलचा रहिवासी गंधम भूवन जय या आठ वर्षांच्या मुलाने १८ सप्टेंबर रोजी युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर केले होते.
Join Our WhatsApp Community