किडनी हा मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असून, तो रक्त शुद्धीकरणाचे कार्य करतो. शरीरातील सर्व अशुध्दी बाहेर टाकण्याचे काम किडनी अर्थात मूत्रपिंड करते. योग्य काळजी न घेतल्यास मूत्रपिंडाचे रोग उद्भवतात. शरीरातील एक किडनी निकामी झाली, तरी माणूस दुस-या किडनीवर स्थिर आयुष्य जगू शकतो.
परंतु दुर्दैवाने दोन्ही किडनी निकामी झाल्यास डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, न्यूयॉर्कमधील शल्यचिकित्सकांनी किडनीच्या संबंधित त्रासाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी महत्वाचा प्रयोग केला आहे. या डॉक्टरांच्या तुकडीने मानवी शरीरात डुक्कराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करत, किडनी आजाराने ग्रस्त असणा-या लोकांना दिलासा दिला आहे.
(हेही वाचाः ‘या’ देशांत पुन्हा वाढतोय कोरोनाचा ताप)
प्रत्यारोपणाचा प्रयत्न यशस्वी
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील एनव्हाययू लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील शल्यचिकित्सकांनी मानवी शरीरात डुक्कराच्या किडनीचे प्रत्यारोपण यशस्वी केले आहे. या शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्टरांच्या तुकडीचे नेतृत्व डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी केले. रुग्णाचा मेंदू ब-याच काळ डेड असल्यामुळे, ही शस्त्रक्रिया नातेवाईकांची रितसर परवानगी घेऊन करण्यात आली, असे डॉक्टर मॉन्टगोमेरी यांनी स्पष्ट केले.
पहिलाच मानवी प्रयोग
शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवस रुग्णाचे निरीक्षण करुन, मानवी शरीराने डुक्कराची किडनी स्वीकारल्याने डॉक्टरांकडून देखील आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यामुळेच आता विविध देशातील शास्त्रज्ञ डुक्करावर संशोधन करणार आहेत. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, डुक्करांचे मूत्रपिंड एक वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते. परंतु मानवावर प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जवळपास 1 लाख 7 हजार अमेरिकन हे विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी, 90 हजार नागरिकांना मूत्रपिंडाची आवश्यकता आहे. या अवयवाच्या कमतरतेमुळे दिवसाला 17 अमेरिकन नागरिक मरण पावत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचाः ते आले, त्यांनी पाहिलं आणि लुटून नेलं सारं… काय आहे पुण्यातील घटना)
Join Our WhatsApp Community