मुंबईसह राज्यात एका बाजूला पाऊस येतो, तर दुसरीकडे ऑक्टोबर हिट सुरु आहे. अशा सर्व वातावरणात ज्या ऋतुची आतुरतेने प्रतीक्षा लागली आहे, ती थंडी मात्र येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत एक सुखद बातमी आली आहे. थंडी महाराष्ट्रात आली आहे, पण ती थेट महाबळेश्वरमध्ये अवतरली आहे. या ठिकाणी पारा थेट १४ अंशावर घसरला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यातील इतरही भागात थंडी जाणवणार आहे.
महाबळेश्वर खालोखाल चक्क पुणेकरांना लॉटरी लागली आहे. तेथील पारा १६ अंशावर आल्याने जसा अचानक पाऊस आल्यावर छत्र्या शोधण्याची घाई लागते, तशी शोधाशोध पुणेकरांची कपाटात ठेवलेले गरम कपडे शोधण्यासाठी लागली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर, पाषाण, राजगुरूनगर, तळेगाव परिसरात तापमान १६अंशावर आले होते. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामंध्ये पारा १८ अंशावर घसरला. दिवसा उन्हाचे चटके सहन करायला लागल्यावर रात्री गारवा सहन करायला लागणार आहे.
असे असेल वातावरण
- २२ ऑक्टोबर रोजी कोकणत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे हवामान कोरडे राहणार आहे.
- २३ ऑक्टोबर रोजीही कोकणात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे हवामान कोरडे राहणार आहे.
- २४-२५ ऑक्टोबर रोजी कोकणसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे हवामान कोरडे राहणार आहे