गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा अडथळा दूर

या प्रकल्पातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लिंक रोड प्रकल्पाला गती मिळणार आहे.

150

मुंबई महापालिकेच्या वतीने प्रगतीपथावर असलेल्या गोरेगांव–मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) बांधकामामधील ३५ अतिक्रमणे गोरेगाव पी/दक्षिण विभागाने कारवाई करत जमीनदोस्त केली. पी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकल्पातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लिंक रोड प्रकल्पाला गती मिळणार आहे.

इतकी अतिक्रमणे हटवली

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी गोरेगांव–मुलुंड लिंक रोडचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामात अडथळा ठरणारी एकूण १०१ अतिक्रमणे निश्चित करुन कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. पी/दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील १५० फूट रुंदीच्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाच्या दक्षिणेकडील व चित्रनगरी (फिल्मसिटी) रस्त्याच्या पश्चिमेकडील अशा एकूण २ हजार २४० मीटर लांबीच्या रस्ता रेषांमध्ये ही अतिक्रमणे असून, यापैकी २ हजार १५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत.

IMG 20211022 WA0028

(हेही वाचाः बोरीवलीतील एल.टी. मार्ग, एस.व्ही.मार्गावरुन चालायचे कसे? नगरसेवकांचं लक्ष कुठे?)

२१० मीटर लांबीची जागा अतिक्रमणमुक्त

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त(प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या आदेशानुसार, या प्रकल्पाला वेग देण्याच्या दृष्टीने टप्प्यात ३५ अतिक्रमित बांधकामे हटवण्याची कारवाई पी/दक्षिण विभागाने गुरुवारी २१ ऑक्टोबर २०२१ ला पूर्ण केली. या कारवाईमुळे २१० मीटर लांबीची रस्त्याच्या पश्चिमेकडील जागा गोरेगांव-मुलुंड लिंक रोडच्या रुंदीकरणासाठी उपलब्ध झाली आहे. या जागेत सिमेंट काँक्रिट व डांबरीकरणाचा रस्ता, तसेच पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे काम गोरेगांव-मुलुंड लिंक रोड विभागामार्फत त्वरित सुरू करण्यात येणार आहे.

उड्डाणपूलही बांधणार

या प्रकल्पाचा भाग म्हणून जनरल अरुणकुमार वैद्य रस्ता ते चित्रनगरी रस्ता असा १.२९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल रत्नागिरी हॉटेल चौकात प्रस्तावित आहे. हा उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३ असा एकूण ६ मार्गिकांचा असेल. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी देखील आता जागा उपलब्ध झाली आहे. सदर उड्डाणपूल तसेच मुलुंडमधील उड्डाणपूल बांधकामासाठी एकत्रित निविदा मागवून, पात्र निविदाकारांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन लवकरच उड्डाणपुलाचे बांधकाम देखील सुरू होणार आहे.

(हेही वाचाः अनधिकृत बांधकामांची गय करू नका, बिनधास्त तोडा! मुख्यमंत्र्यांचा आदेश)

अधिका-यांच्या उपस्थितीत कारवाई

उप आयुक्त(परिमंडळ-४) भारत मराठे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) राजन तळकर, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, पी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पूर्ण केली. दोन जेसीबी संयंत्रांच्या सहाय्याने परिरक्षण विभागातील सहायक अभियंता तांबे, दुय्यम अभियंता धर्माधिकारी व कनिष्ठ अभियंता येडले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चित्रनगरी मार्गावरील ही ३५ अनधिकृत बांधकामे काढली.

IMG 20211022 WA0029

ही कारवाई करताना दिंडोशी स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांबळे, पोल्स निरीक्षक चव्हाण यांच्यासह २५ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. अखेरची शिल्लक १४ अतिक्रमित बांधकामे लवकरच प्राधान्याने काढण्यात येऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, पी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः बेहराम पाड्यातील अनधिकृत बांधकामांपासून कारवाई सुरू करा! सोशल मीडियावर होत आहे मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.