रेल्वे आत्महत्यांमध्ये वाढ… गेल्या 9 महिन्यांत इतक्या घटना वाढल्या

डिसेंबर शेवटपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

161

कोरोना काळात ठप्प झालेले मुंबईचे जनजीवन हळूहळू पूर्ववत होऊ लागले असताना, मुंबईतील उपनगरीय ट्रेन खाली आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ ९ महिन्यांत रेल्वे खाली ४२ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बेरोजगारी, कर्जबाजारी आणि घरगुती कलहातून या आत्महत्या झाल्याचे कारण समोर येत आहे.

कोरोनाने मोडले कंबरडे

देशात कोरोनाच्या आजाराने २०१९ च्या शेवटी शिरकाव केला होता. मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. आपत्कालीन सेवा वगळता देशाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते. आठ ते दहा महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नोकरदार वर्गाचे कंबरडे मोडले, व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या जाऊन अनेक जण बेरोजगार झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता येऊ लागली. मात्र ही शिथिलता काही महिने देखील टिकली नाही आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून जनजीवन पूर्ववत होत असताना, अनेक जण नोकरीच्या शोधात बाहेर पडू लागले आणि हताश होऊन घरी परतु लागले होते.

(हेही वाचाः पुण्यात भर दुपारी गँगवार : वाळू व्यावसायिकासह २ जणांचा मृत्यू)

आत्महत्यांचा आकडा वाढला

उपनगरीय रेल्वे सेवा पूर्ववत झाल्यानंतर रेल्वेतील अपघाताचे प्रमाण वाढले. त्यात अधिकांश अपघात हे केवळ अपघात नसून आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये वर्षभरात मुंबई उपनगरीय रेल्वेत केवळ २७ आत्महत्येची नोंद रेल्वे पोलिस ठाण्यात झाली होती. मात्र २०२१ मध्ये केवळ ९ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते सप्टेंबर मध्ये ४२ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. डिसेंबर शेवटपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हे आहे कारण

बहुतांश आत्महत्या बेरोजगारी, कर्जबाजारी आणि घरगुती कलहातून झाल्याचे समोर आले असल्याचे एका पोलिस अधिका-याने सांगितले. रेल्वेत होणारे अपघात वगळता या आत्महत्येच्या घटना वेगळ्या असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला, दररोजच्या खर्चाचे वांदे, त्यात महागाई, घराचा हप्ता या सर्वातून कुटुंब चालवणे मुश्किल होऊन बसल्यामुळे, अनेकजण आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः वन अविघ्न पार्क अग्नितांडवः मॉक ड्रील होऊनही उडाला गोंधळ! चूक कोणाची?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.