खेळाडूंच्या सरावाचे आवडते ठिकाण म्हणून नावाजलेले पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये स्थिती छत्रपती संभाजी राजे मैदानाचा आता कायापालट करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांच्या निरनिराळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या या मैदानात दरदिवशी या मैदानास दररोज किमान दीड ते दोन हजार नागरिक, लहान मुले, जेष्ठ नागरिक भेट देत असतात. विशेषतः क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, लांब उडी इत्यादी खेळ या मैदानावर खेळणे शक्य असून त्या दृष्टीने क्रीडा विषयक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाजपच्या स्थानिक नगरसेविका रजनी केणी यांचा प्रयत्नातून मैदान साकारण्यात आला आहे.
मुलुंड (पूर्व) मध्ये वीर सावरकर मार्गावर २६ हजार २१६ चौरस मीटर क्षेत्रावर छत्रपती संभाजी राजे मैदान विस्तारलेले आहे. सकाळी ६ पासून रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असलेले हे मैदान कायम गजबजलेले असते. कारण या मैदानावर निरनिराळ्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मैदानावर अत्यंत सुसज्ज अशी प्रकाशव्यवस्था केल्यामुळे रात्रीच्या वेळीदेखील खेळाडू बिनदिक्कत खेळू शकतात. त्यामुळे मोठ्या संख्येने खेळाडू या मैदानावर सराव करताना आढळतात. त्यासोबत व्यायामाची साहित्यं आणि लहान मुलांकरिता खेळण्याची साधने देखील उपलब्ध असल्याने नागरिकांचा या मैदानाकडे कायम ओढा असतो.
त्या सोबत, येथे योगा केंद्रही आहे. मैदान परिसरातील उद्यानात येणारे नागरिक या केंद्रात योग साधना करतात. मैदानाच्या कडेने सुसज्ज जॉगिंग ट्रॅक व आकर्षक हिरवळ आहे. जॉगिंग ट्रॅकच्या जोडीला सुसज्ज संगीत यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्याचा व्यायाम करताना हिरवळ आणि संगीत असा दुहेरी आनंद अनुभवता येतो.
याशिवाय, जेष्ठ नागरिकांना निवांत बसून मित्रांशी गप्पा गोष्टी करण्यासाठी गजेबो तयार केलेले आहेत. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी खास असा वृत्तपत्र कक्ष तयार करण्यात आल्याने वाचनाची आवड असणाऱ्यांना हक्काची जागा मिळाली आहे.
विशेष म्हणजे, कलावंतांचा विचार करून आकर्षक असा खुला रंगमंच सुद्धा या मैदानावर बांधण्यात आला आहे. त्याही पुढे जाऊन, कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प येथे साकारण्यात आला आहे. त्यामुळे हे मैदान म्हणजे एक परिपूर्ण ठिकाण ठरले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी ह्यांनी दिली आहे.
पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह इत्यादी आवश्यक सुविधा देखील येथे पुरविण्यात आल्या आहेत. या मैदानास दररोज किमान दीड ते दोन हजार नागरिक, लहान मुले, जेष्ठ नागरिक भेट देत असतात.
Join Our WhatsApp Community