राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त उल्हासनगर येथे पोहोचलेले महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कलानी महाल येथे पप्पू कलानी यांची भेट घेतल्यानंतर एक खळबळ उडवणारी मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले उल्हासनगर महापालिकेतील २२ नगरसेवक राष्ट्रवादीत एन्ट्री करणार आहेत. यापूर्वी कलानी यांची सून पंचम कलानी यांनी अचानक भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.
माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर कलानी कुटुंबात राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे भाजपपासून दूर असलेले ओमी कलानी आणि त्यांचे वडील पप्पू कलानी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे वळण्याचा आग्रह धरताना दिसले. गेल्या १५ दिवसांपूर्वी पप्पू कलानी यांची उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी चर्चा झाली होती. आयलानी यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते.
(हेही वाचा- भारतात साकारणार ‘मोबाईल रुग्णालय’ जाणून घ्या काय आहे योजना)
कलानी गटाला मोठा झटका
यानंतर आता भाजपाला कलानी गटाने मोठा झटका दिला आहे. या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीनंतर ओमी गटाचे २२ नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपचे एकूण ४० नगरसेवक असून त्यापैकी २२ नगरसेवक ओमी कलानी गटाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही अपात्रतेची कारवाई होणार नाही आणि भाजप या नगरसेवकांना व्हीप देखील जारी करू शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रातिनिधित्व करणाऱ्या कलानी कुटुंबात सध्या कोणीही नव्हते, मात्र यानंतर आता उल्हासनगर महापालिकेतील कलानी गटाने राष्ट्रवादीत एन्ट्री केल्यानंतर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community