बेजबाबदार ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप! सामान्यांचा ‘असा’ होतोय घात! 

कोरोनाच्या अहवालासाठी नमुना घेणारे संबंधित रुग्णालय, आरोग्य सेतू, माय गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र सरकारचे आपत्कालीन विभाग अशा ४ यंत्रणा कामाला लावणे आणि त्याही चुकीच्या पद्धतीने काम करत असणे हे आजही कोरोना अहवालासंबंधी प्रक्रियेत ढिसाळ कारभार सुरू आहे हेच दिसते.

181

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल इंडिया ही संकल्पना कौतुकास्पद आहे. कोरोना महामारीवरही पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून एकच रामबाण उपाय शोधला, तो म्हणजे ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’, या अ‍ॅपवर सर्व माहिती अद्ययावत केली जाते, पण ती इतकी तत्परतेने केली जाते की, रुग्णांची अक्षरशः घालमेल सुरू होते. आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुना घेतल्याचे लॅबने कळवणे म्हणजे संबंधित रुग्ण कोरोनाग्रस्त झाला आहे, असे प्रत्यक्ष अहवाल येण्याआधीच या अ‍ॅपवर जाहीर केले जाते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अ‍ॅपची निर्मिती करून दीड वर्षे उलटली तरी अ‍ॅपमधील गोंधळ काही संपता संपत नाही.

काय आहे प्रकरण?

पनवेल स्थित एका व्यक्तीला कोरोनासंबंधी लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्या व्यक्तीने एमजीएम या खासगी रुग्णालयाशी संपर्क साधला. तिथे कोविड विभागातून त्या व्यक्तीला आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार सशुल्क चाचणी करण्यात आली. स्वॅब घेण्यात आले. संबंधित व्यक्तीने नमुना घेणाऱ्यांना ‘अहवाल ऑनलाईन मिळेल का’, असे विचारले असता तिला ‘नाही’, असे उत्तर दिले.  प्रत्यक्ष येवून अहवाल घ्यावा लागेल, असे सांगण्यात आले. त्याच वेळी रुग्णालयाने नमुना घेतल्याचे आयसीएमआरला कळवले, कारण ती माहिती तात्काळ ‘माय गव्हर्नमेंट’मध्ये आणि नंतर आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये अद्ययावत झाली. त्यानुसार ‘माय गव्हर्नमेंट’कडून संबंधित व्यक्तीला एसएमएस पाठवण्यात आला आणि ‘आपला नमुना एमजीएम रूग्णालयात घेण्यात आला आहे आणि अहवाल येईपर्यंत आपण विलागिकरणात रहा’, असे सूचित करण्यात आले.

New Project 65

संबंधित व्यक्तीने दुसऱ्या दिवशी आरोग्य सेतू अ‍ॅप सुरू करून मोबाईल क्रमांक अपडेट केल्यावर मोबाइलच्या स्क्रीनवर ‘वैद्यकीय सेवेची गरज आहे!’, अशा ठसठशीत अक्षरात संदेश दिसला. त्यात ‘आयसीएमआरनुसार अमुक या मोबाईल क्रमांकाची असलेली व्यक्ती कोविड १९ सकारात्मक आहे’, असेही त्यात म्हटले.

New Project 62

आरोग्य सेतू अ‍ॅप बनला मनस्तापासाठी कारणीभूत

संबंधित व्यक्तीने मनाची तयारी केली, घरातील सदस्यांचीही तयारी केली, पैशाची तरतूद केली, सोबत सात दिवस रहावे लागेल म्हणून कपडे, आवश्यक साहित्य भरून बॅग घेवून एमजीएम रुग्णालय गाठले, तिथे अहवालाची विचारपूस केली, तेव्हा रुग्णालयातील ज्या प्रयोगशाळेत नमुना तपासण्यात आला, तेथून संबंधित व्यक्तीला अहवाल देण्यात आला, तो अहवाल चक्क निगेटिव्ह होता.

New Project 67

क्षणभर चक्रावून गेलेल्या व्यक्तीने अखेर संबंधित प्रयोगशाळेच्या प्रमुखास हा प्रकार लक्षात आणून दिला, तेव्हा त्यांनी सांगितले, ‘हे शक्यच नाही, आम्ही आयसीएमआरला रिपोर्ट अजून कळवला नाही आणि तशी ऑनलाईन अहवाल देण्याची पद्धत आता राहिली नाही’, असे म्हटले. मात्र घडल्या प्रकाराच्या मुळाशी जाण्यास त्यांनी स्वारस्य दाखवले नाही.

(हेही वाचा : कानपूर मध्ये ‘बिल जिहाद’! असा होत आहे मुस्लिम धर्माचा प्रचार)

रुग्णाची अशी झाली फरफट

आयसीएमआर, आरोग्य सेतू अ‍ॅप, माय गव्हर्नमेंट इत्यादी केंद्र सरकारच्या यंत्रणामधील हा कमालीचा समन्वयाचा अभाव होता. या यंत्रणासाठी हा क्षुल्लक प्रकार असेल, पण आरोग्य सेतू अ‍ॅपवर आलेल्या चुकीच्या संदेशामुळे संबंधी व्यक्तीची मानसिकता, तिच्या घरातील सदस्यांची मानसिकता ढासळली, ती व्यक्ती ज्या कार्यालयात काम करते, त्या कार्यालयातील सहकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला, त्याही उपर संबंधित व्यक्तीला घराबाहेर पडल्यावर रुग्णालयात जाण्यासाठी कोविड पोझिटीव्ह असल्याचे माहित असून रिक्षात बसावे लागले, नाईलाजास्तव एटीएममध्ये जावून तातडीने काही रक्कम काढावी लागली, दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करून रुग्णालय गाठावे लागले आणि रुग्णालयात अहवाल पाहिल्यावर तो निगेटिव्ह आहे, हे समजल्यावर त्या व्यक्तीला आनंद न होता अधिकचा मनस्ताप झाला. देशभरात आजच्या घडीला तुलनेत फार कमी संख्येने चाचण्या होत आहेत, तरीही इतका पराकोटीचा समन्वयाचा अभाव आरोग्य सेतू अ‍ॅपसह अन्य केंद्रीय यंत्रणांमध्ये दिसत आहे, मग कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या उच्चांकी वातावरणात काय गोंधळ घातलेला असेल, याचा विचारच न केलेला बरा. हा अध्याय इथेच संपत नाही. एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्स वेळी पोलिस येतात, त्याप्रमाणे या नाट्यामध्ये शेवटी महाराष्ट्र सरकारच्या आपत्कालीन विभागाची एंट्री झाली. संबंधित व्यक्तीने दिवसभर मनस्ताप सहन केला, अखेर प्रत्यक्ष रूग्णालयात जावून अहवाल घेतला, घरी येवून झोपी गेल्यावर रात्री उशिरा महाराष्ट्र सरकारच्या आपत्कालीन विभागाचा एसएमएस आला त्यात ऑनलाईन अहवालासाठी लिंक देण्यात आली होती, त्यावर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्यात आला होता.

New Project 68

 

यावरून संबंधित यंत्रणांना या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील

  • सरकारने खाजगी रुग्णालयाला कोविड चाचणीची परवानगी दिली आहे, तर मग अजूनही देशभरातील सर्व प्रयोग शाळेतील नमुन्यांच्या माहितीचे आयसीएमआरकडे केंद्रीकरण करण्याची पद्धत कायम ठेवली आहे का?
  • नसेल तर एमजीएम रुग्णालयाने नमुना घेतल्यावर ती माहिती आयसीएमआरकडे का पाठवली?
  • माहिती पाठवल्यावर रिपोर्ट आयसीएमआरला का कळवला नाही?
  • आयसीएमआरला नमुना घेतल्याची माहिती संबंधित रुग्णालयाने कळवल्यावर ती माहिती माय गव्हर्नमेंट अ‍ॅप वर का अपडेट झाली? कुणी केली? आणि या अ‍ॅपवरून एसएमएस संबंधित व्यक्तीला का पाठवण्यात आला? त्यात ‘आपला अहवाल पुढील लिंकवर ऑनलाइन मिळेल’ असेही नमूद करण्यात आले, ज्या लिंकवर क्लिक करताच ‘service unavailable’ असे दिसते, तर मग ‘माय गव्हर्नमेंट’ने बिनकामाचे एसएमएस पाठवण्याचा खटाटोप का केला?
  • सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य सेतू अ‍ॅप ने संबंधित व्यक्तीचा नमुना चाचणी अहवाल आला नाही तरी अ‍ॅपवर संबंधित व्यक्तीला कोरोना बाधित म्हणून कोणत्या आधारे जाहीर केले? तसेच संबंधित व्यक्तीला वैद्यकीय सेवेची गरज आहे, असे का म्हटले?
  • यात महाराष्ट्र सरकारच्या आपत्कालीन विभागानेही एसएमएस का पाठवला? तोही दीड दिवसांनंतर कसा आला? त्यांनी दिलेल्या लिंकवर अहवाल कसा दिसला? मग माय गव्हर्नमेंटच्या एसएमएसमध्ये योग्य लिंक का देण्यात आली नाही?

एका अहवालासाठी संबंधित रुग्णालय, आरोग्य सेतू, माय गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र सरकारचे आपत्कालीन विभाग अशा ४ यंत्रणा कामाला लावणे आणि त्याही चुकीच्या पद्धतीने काम करत असणे हे आजही कोरोना अहवालासंबंधी प्रक्रियेत ढिसाळ कारभार सुरू आहे हेच दिसते.

(हेही वाचा : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस आवश्यक!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.